लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
मुंबई – कुर्ला येथील कोहिनूर रुग्णालयात ८२ वर्षांच्या एका रुग्णाला सतरा लाख दहा हजाराचे बिल देण्यात आल्यानंतर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज या हॉस्पिटलला भेट दिली. या भेटीत ८२ वर्षांच्या वृद्ध रुग्णाला ४०० इंजक्शन्स दिल्याचे व पीपीइ किटसाठी दोन लाख रुपये आकारल्याचे बिल तपासले असता दिसून आले. या लुटमारीविरोधात पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याकडे आपण लेखी तक्रार करणार असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

“महाविकास आघाडी सरकार हे ‘महा फसवणूक आघाडी’ असल्यामुळे गेले पाच महिने मुंबई व ठाणे जिल्ह्यात तसेच पुण्यात बहुतेक खाजगी रुग्णालयांनी करोना रुग्णांची पुरती लूटमार चालवली आहे. आता जागे झालेल्या सरकारने रुग्णालयांकडून होणारी लुटमार रोखण्यासाठी भरारी पथक स्थापन करण्याची घोषणा केली असली तरी ते केवळ कागदावरच असल्या”चे प्रवीण दरेकर यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते तसेच भाजप मुंबईचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी कुर्ला येथील कोहिनूर हॉस्पिटलला भेट दिली असता रामचंद्र दरेकर वय ८२ यांना एक महिन्याचे बिल १७ लाख १० हजार रुपये आकारण्यात आल्याचे दिसून आले. विरोधीपक्ष नेते येणार हे कळताच बिल १३ लाख करण्यात आले मात्र या सर्व बिलांची तपासणी केली असता पीपीइ किटसाठी दोन लाख रुपये आकारल्याचे तसेच ४०० इंजक्शन ८२ वर्षांच्या रुग्णाला दिल्याचे बिलावरून दिसत असल्याचे दरेकर यांनी माध्यमांना सांगितले.

बाजारात ३०० ते ४०० रुपयांना मिळणाऱ्या पीपीइ किटसाठी २७०० रुपये आकारण्यात आले असून एक महिन्याचे १७ लाख बिल ही लूटमार असल्याचे प्रवीण दरेकर म्हणाले. मुंबईतील ३५ खासगी रुग्णालयात रुग्णांकडून जादा बिल आकारले जाते का हे तपासण्यासाठी मुंबई महापालिकेने पाच सनदी अधिकारी व ६० हून अधिक लेखापरीक्षक नियुक्त केल्याचे आयुक्त चहल यांनी सांगितले होते. ही मंडळी नेमकं करतात काय, त्यांना ही लूटमार का दिसत नाही असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला.अग्निशमन दलातून सेवानिवृत्त झालेले हे रुग्ण ज्यांनी आपले सर्व आयुष्य लोकांचे जीव वाचविण्यासाठी खर्ची घातले. त्यांचा जीव वाचू शकला नाहीच, उलट सतरा – अठरा लाखांचे बिल येतेच कसे असा सवालही उपस्थित केला जात आहे.

एक डॉक्टर एकावेळी पीपीइ किट घालून २५ ते ५० रुग्णांना तपासू शकतो. अशाप्रकारे पळवाट काढून सर्वसामान्य रुग्णांची लूट खासगी रुग्णालयांकडून केली जाते. हे भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही. याआधी आपण बोरिवलीच्या अॅपेक्स हॉस्पिटल मध्येही असे प्रकरण उघडकीस आणसे, कांदिवलीच्या पार्थ हॉस्पिटलचे प्रकरण काढले, ठाण्यातही असे लुटमारीचे प्रकार घडत आहेत, त्यामुळे आता भाजपाच्यावतीने मुंबईतील सर्व खासगी हॉस्पिटलचा लेखाजोखा घेतल्याशिवाय राहणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी आज दुपारी कोहिनूर रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालायच्या वतीने रुग्णालयाचे उपाध्यक्ष अतुल मोडक उपस्थित होते. दरेकर यांनी यावेळी रुग्णाला पाठविण्यात आलेल्या लाखो रुपयांच्या बिलाची माहिती मोडक तसेच प्रशासकीय अधिका-यांना विचारली. वैदयकीय उपचारासह अन्य वैदयकीय साहित्याचे अवाजवी बिल रुग्णालयाकडून आकारल्याचे यावेळी दरेकर यांनी सिध्द करुन दाखविले.
याप्रसंगी सहाय्यक पोलिस आयुक्त रविंद्र पाटील, कुर्ला पश्चिम येथील विनोबा भावे नगर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश पवार, भाजपा उत्तर मध्य जिल्हा अध्यक्ष, नगरसेवक सुषम सावंत, नगरसेवक हरिष भांदिर्गे आदी उपस्थित होते.