मुंबई : कोकण रेल्वेमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असून गेल्या काही महिन्यांपासून कोकण रेल्वे प्रशासन सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबवत आहे. या मोहिमेदरम्यान एप्रिल २०२४ मध्ये प्रतिदिन सरासरी ५०४ विनातिकीट प्रवाशांना पकडण्यात आले असून त्यांच्याकडून सरासरी सुमारे ९ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त मोठ्या संख्येने नागरिक कोकणात जातात. तसेच कोकणातून मुंबईकडे प्रवास करणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. मात्र अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करीत असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रवाशांमुळे तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होत होता. त्यामुळे एप्रिल महिन्यात तिकीट तपासणी मोहीम राबवून एकूण १५ हजार १२९ प्रवासी तिकीटाविनाच प्रवास करीत असल्याचे आढळले होते. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून एकूण दोन कोटी ६९ लाख ८५ हजार २५६ रुपये दंड वसूल करण्यात आला.

हेही वाचा – घाटकोपर दुर्घटनेच्या तपासासाठी ‘एसआयटी’, भावेश भिंडेच्या कार्यालयातून कागदपत्रे जप्त

हेही वाचा – देशविरोधी भूमिका घेतल्याप्रकरणी निलंबन प्रकरण : विद्यार्थ्याच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाचा नकार

कोकण रेल्वेवरील अनियमित/अनधिकृत प्रवाशांकडून वसूल करण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वाधिक दंड आहे, असे कोकण रेल्वेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. भविष्यात कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गावर प्रभावीपणे तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी योग्य आणि वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे.