कुख्यात गुंड छोटा राजन याचा कथित हस्तक रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभय्या याच्या २००६ साली झालेल्या बनावट चकमकीमध्ये बडतर्फ ‘चकमकफेम’ पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची सगळ्या आरोपांतून निर्दोष सुटका झाल्याच्या पार्श्वभूमीवर, आज (गुरूवार) लखनभय्या याचा वकिल भाऊ रामप्रसाद गुप्ता याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. शर्मा यांच्याविरोधात पुरावे असल्याने सत्र न्यायालयाने प्रदीप शर्मा यांच्याबाबतील दिलेला निकाल चुकीचा असल्याचे त्याने यात म्हटले आहे.
मागील महिन्यात लखनभय्या याच्या बनावट चकमकीवर सत्र न्यायालयाने निकाल देताना एकीकडे निलंबित पोलीस अधिकारी प्रदीप सूर्यवंशी आणि १२ पोलिसांसह एकूण २१ आरोपींना दोषी ठरविले, तर दुसरीकडे बडतर्फ ‘चकमकफेम’ पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची मात्र सगळ्या आरोपांतून निर्दोष सुटका केली.
या खटल्यातील मुख्य साक्षीदार अनिल भेडा याच्या हत्येने प्रकरणाला वेगळे वळण दिले. त्याचा फायदा शर्मा यांना झाला असल्याचे बोलले जात आहे. १३ मार्च २०११ रोजी भेडा अचानक बेपत्ता झाला. एक महिन्यानंतर त्याचा मनोर येथे मृतदेह सापडला. या प्रकरणाची गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lakhan bhaiyya encounter brother moves hc against sharmas acquittal
First published on: 08-08-2013 at 01:39 IST