scorecardresearch

घरातूनच घ्यावं लागणार लालबागच्या राजाचं दर्शन; मंडळानं घेतला महत्त्वाचा निर्णय

करोना परिस्थिती आणि भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गणेश मंडळानं निर्णय घेतला आहे…

Ganesh Chaturthi,Lalbaugcha Raja LIVE, Lalbaugcha Raja, Lalbagcha raja
यंदाही साधेपणानं गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं असून, दर्शनासाठी भाविकांची गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्याचीही सूचना करण्यात आलेली आहे.

करोनाचं संकट अजूनही कमी झालेलं नसून, राज्य सरकारनं गणेशोत्सवासंदर्भात नियमावली जाहीर केली आहे. यंदाही साधेपणानं गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं असून, दर्शनासाठी भाविकांची गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्याचीही सूचना करण्यात आलेली आहे. यापार्श्वभूमीवर लालबागचा राजा गणेश मंडळाने गणेशभक्तासाठी ऑनलाईन दर्शनाची सोय करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाविकांना यंदाही लालबागच्या राजाचं घरातूनच दर्शन घ्यावं लागणार आहे.

गेल्यावर्षी गणेशोत्सव करोनाच्या सावटातच साजरा करण्यात आला. मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने लालबागच्या राजाच्या दर्शनाला भाविकांची होणारी अलोट गर्दी लक्षात घेऊन आणि करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लालबागच्या राजाची मूर्तीची प्रतिष्ठापना न करता फक्त आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचबरोबर ऑनलाईन दर्शनाची सोय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. यंदाही गणेश मंडळाने भाविकाच्या आरोग्याचा विचार करून ऑनलाईन दर्शनाची सोय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

यंदा गणेशोत्सव साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना

१) गणेशोत्सवासाठी महामंडळांनी महापालिका वा स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणं आवश्यक असेल.

२) करोनामुळे महापालिका वा स्थानिक प्रशासनाने ठरवलेल्या धोरणानुसार मर्यादित स्वरूपातच मंडप उभारण्यात यावा. गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणं अपेक्षित असल्यानं भपकेबाज सजावट करणं टाळावं.

३) सार्वजनिक गणेश मंडळातील मूर्तीची उंची ४ फूट आणि घरातील मूर्तीची उंची २ फुटांपेक्षा जास्त उंच नसावी.

४) शक्य असल्यास गणेशमूर्तीऐवजी धातूच्या वा संगमरवरी मूर्तीचं पूजन करावं. शक्यतोवर घरच्या घरी मूर्तीचं विसर्जन करावं. ते शक्य नसल्यास जवळच्या कृत्रिम विसर्जनस्थळी मूर्ती विसर्जित करावी.

५) स्वच्छेने दिलेल्या देणग्याच स्विकाराव्यात. जाहिरातींमुळे गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. आरोग्य विषयक आणि सामाजिक संदेश देणाऱ्या जाहिराती करण्याला प्राधान्यक्रम द्यावा.

६) सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम वा शिबिरे घेण्याला प्राधान्य देण्यात यावं. स्वच्छतेबाबत जनजागृती करावी.

७) राज्य सरकारने लागू केलेले निर्बंध गणेशोत्सवातही कायम असतील. शिथिल केले जाणार नाहीत.

८) आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे पालन करण्यात यावे.

९) नागरिकांची गर्दी होऊ नये या अनुषंगाने गणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्किंग, वेबसाईट, फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करावी.

१०) गणपती मंडपात निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी.

११) आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढू नये. विसर्जन स्थळी करण्यात येणारी आरती घरीच करावी. लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांनी विसर्जन स्थळी जाणं टाळावं. चाळीतील आणि इमारतीतील गणेशमूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्र काढू नये.

१२) महापालिका, विविध मंडळं, गृहनिर्माण संस्था, लोक प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी.

१३) करोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारसह, आरोग्य विभाग, महापालिका प्रशासन, स्थानिक पोलीस प्रशासन यांनी ठरवून दिलेल्या नियमांचं पालन करण्यात यावं.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-08-2021 at 10:49 IST
ताज्या बातम्या