पक्षांतर करून आलेल्यांना भाजपची विधान परिषदेची उमेदवारी

कोल्हापूरमधून अमल महाडिक, धुळे-नंदूरबारमधून अमरीश पटेल तर अकोला-बुलडाणा-वाशिममधून वसंत खंडेलवाल यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.

मुंबईतून राजहंस सिंह यांना संधी

मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी भाजपने पक्षांतर करून आलेल्यांना झुकते माप दिले असून मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजहंस सिंह यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

कोल्हापूरमधून अमल महाडिक, धुळे-नंदूरबारमधून अमरीश पटेल तर अकोला-बुलडाणा-वाशिममधून वसंत खंडेलवाल यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या मान्यतेनंतर उमेदवारांची यादी शुक्रवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली. विधान परिषदेच्या सहा जागांसाठी १० डिसेंबरला निवडणूक होत आहे.

मुंबईतून उपाध्यक्षा चित्रा वाघ, राजहंस सिंह, कृपाशंकर सिंह यांच्यासह १२ जणांची नावे प्राथमिक यादीत होती. राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या चित्रा वाघ यांना नुकतेच राष्ट्रीय कार्यकारिणीतही स्थान देण्यात आल्याने विधान परिषदेची उमेदवारी दिल्यास पक्षातील नेत्यांची नाराजी वाढण्याची भीती होती. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजहंस सिंह की कृपाशंकर सिंह याबाबत वरिष्ठ स्तरावर विचारविनिमय होऊन राजहंस सिंह यांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाले. राजहंस हे काँग्रेसमध्ये असताना महापालिकेत विरोधी पक्षनेते होते. ते २०१९मध्ये भाजपमध्ये आले. त्यांनी मालाडमधून विधानसभेची निवडणूकही लढविली होती.

माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विधानसभेची उमेदवारी २०१९ मध्ये नाकारण्यात आली होती. मात्र त्यांना नंतर प्रदेश सरचिटणीसपद देण्यात आले. ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचे निकटवर्ती असलेल्या बावनकुळे यांना आता विधानपरिषदेची उमेदवारी देऊन त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यात आला आहे.

कोल्हापूरमध्ये सतेज पाटील यांच्याशी लढत देण्यासाठी महाडिक घराण्यातील अमल महाडिक यांना उमेदवारी देण्यात आल्याने आता सामना जोरदार होईल. ही जागा निवडून आणण्याचा निर्धार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला होता. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक, माजी आमदार सुरेश हाळवणकर, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांची नावे उमेदवारीसाठी चर्चेत होती.

काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले माजी मंत्री अमरीश पटेल यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. अकोला-बुलडाणा-वाशिम मतदारसंघातून सराफा व्यावसायिक वसंत खंडेलवाल यांना भाजपने उमेदवारी दिली असून ते शिक्षण संस्थेशी संलग्न आहेत.

सिंह यांचा राजकीय प्रवास

काँग्रेसमध्ये असताना राजहंस सिंह हे १९९२ ते ९७ नगरसेवक होते. त्यानंतर पुन्हा २००२ ते २०१२ अशी सलग दहा वर्षे नगरसेवक होते. त्यात २००४ ते २०१४ या कालावधीत ते विरोधी पक्षनेते होते. २००९मध्ये ते विधानसभेवर निवडून आले. २०१७ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Legislative council bjp mumbai municipal election akp

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही
ताज्या बातम्या