विविध मागण्यांसाठी नाशिकहून मुंबईकडे पायी निघालेला किसान सभेचा मोर्चा आज (सोमवार) मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाला. या मोर्चाला अभूतपूर्व पाठिंबा मिळत असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसेसह सर्व राजकीय पक्षही शेतकऱ्यांच्या मागे उभे राहिल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच सेलिब्रिटीसुद्धा मागे राहिले नाहीत. अभिनेत्री हुमा कुरेशीनेही शेतकऱ्यांच्या शांततापूर्ण मोर्चाचे समर्थन करत ट्विट केले आहे.

शेतकरी मोर्चाचा फोटो शेअर करत तिने ट्विटमध्ये लिहिले की, ‘या शांततापूर्ण आंदोलनाला आपलाही पाठिंबा दर्शवूया. क्षुल्लक राजकारणाला बाजूला ठेवूया. यावर तोडगा काय आहे, याचा विचार करूयात.’

Kisan Long March: हो शेतकरी आजारी आहे; आझाद मैदानावर डॉक्टरांचे चेकअप कॅम्प्स

शेतमालाला दीडपट हमीभाव द्यावा, कृषिपंपाचे वीजबिल माफ करा, स्वामीनाथन आयोगाच्या रास्त भावाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, वनाधिकार कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी करा आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी मुंबईत ३० हजार शेतकऱ्यांचा मोर्चा धडकला आहे. मुंबईकर आणि विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी हे शेतकरी रात्रभर पायपीट करत सोमय्या मैदानातून आझाद मैदानात पोहोचले. एकीकडे मोर्चा काढताना सर्वसामान्यांच्या गैरसोयीकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती वाढत असताना शेतकऱ्यांमधील या माणुसकीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.