करोनाची साखळी तोडण्यासाठी सध्या लागू असलेले कठोर निर्बंध १५ मेपर्यंत वाढविण्याचा आदेश राज्य सरकारने गुरुवारी जारी केला. सध्याच्या आदेशात कोणताही बदल करण्यात आलेला नसून, कोणत्याही घटकांना सवलत देण्यात आलेली नाही.

राज्यात १४ तारखेपासून निर्बंध लागू करण्यात आले होते. करोनाचे रुग्ण वाढू लागल्याने २२ तारखेपासून टाळेबंदी लागू करण्यात आली होती. त्याची मुदत १ मे सकाळी ७ पर्यंत होती. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत काही मंत्र्यांचा अपवाद वगळता अन्य मंत्र्यांनी टाळेबंदीत १५ दिवस वाढ करण्याची मागणी के ली होती. टाळेबंदी लागू के ल्यापासून रुग्णसंख्या स्थिरावली आहे. सध्या ६५ हजारांच्या आसपास दैनंदिन रुग्ण आढळतात. सारे व्यवहार आताच पुन्हा सुरू केल्यास रुग्णसंख्या वाढण्याची भीती होती. यातूनच सध्या लागू असलेल्या निर्बंधांना १५ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, या संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जारी केली.

टाळेबंदी लागू करताना १३ व २१ एप्रिल रोजी काढण्यात आलेल्या आदेशात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या आदेशातील सारे निर्बंध कायम राहतील, असे सरकारने स्पष्ट के ले. यानुसार जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते ११ पर्यंत सुरू राहतील. याशिवाय भाजीपाला, फळविक्रेते सकाळी ११ पर्यंत विक्री करू शकतील. अन्य दुकाने मात्र बंदच राहतील. संगणक, प्लम्बर, वीज उपकरणांचे विक्रेते आदींची दुकाने सकाळी उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती; परंतु सरकारने नव्या आदेशात कोणालाही सवलत दिलेली नाही.

मुंबई, ठाण्यात केंद्र, राज्य व महापालिके चे कर्मचारी व वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी उपनगरीय रेल्वेतून प्रवास करू शकतील. अन्य कोणत्याही घटकांना नव्याने रेल्वे प्रवासास मुभा देण्यात आलेली नाही. सध्या लागू असलेल्या आदेशात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पुढील दोन आठवड्यांमध्ये रुग्णसंख्या कमी व्हावी, अशी सरकारची अपेक्षा आहे.

पुणे शहर किं वा विदर्भातील काही भागांमध्ये मार्चच्या अखेरीपासून टाळेबंदी लागू आहे. पुण्यात ५ एप्रिलपासून सारे व्यवहार बंद करण्यात आले. यामुळे टाळेबंदीत वाढ करू नका, अशी पुणेकर दुकानदारांची मागणी होती. १५ दिवस टाळेबंदीत वाढ झाल्याने पुणेकरांचे व्यवहार महिनाभरापेक्षा जास्त काळ बंद राहणार आहेत.