‘लोकांकिका’च्या कलाकारांसह प्रेक्षकांचाही दांडगा उत्साह

 दुसऱ्या बाजूला पडद्यामागे पहिल्या एकांकिकेच्या कलाकारांची लगबग सुरू होती.

मुंबई विभागीय अंतिम फेरी पाहण्यासाठी तरुण, वृद्ध रसिकांची गर्दी

तरुणांमधील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, भावनिक मुद्दय़ांवरील विचारांची दिशा समजून घ्यायची असेल तर त्याला आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धाशिवाय पर्याय नाही. त्यातही ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतील महाविद्यालयीन तरुणांच्या विभिन्न विचारांना कलेच्या माध्यमातून एकत्र आणणारा मंच. त्यामुळेच शुक्रवारी ‘लोकांकिका’च्या मुंबई विभागीय फेरीतील एकांकिका पाहण्यासाठी प्रेक्षकांनी प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़मंदिर येथे गर्दी केली होती.

‘लोकसत्ता लोकांकिका’च्या विभागीय अंतिम फेरीसाठी स्पर्धेच्या अर्धा तास आधी प्रवेशिका मिळणार होत्या. मात्र, त्या वेळेच्याही आधीपासून प्रेक्षकांनी प्रवेशिकांसाठी नाटय़गृहाबाहेर रांग लावली होती. यात आपापल्या महाविद्यालयाच्या चमूचा उत्साह वाढवण्यासाठी आलेल्या तरुणतरुणींप्रमाणे वयोवृद्ध प्रेक्षकांचाही समावेश होता. प्राथमिक फेरीच्या बातम्या वाचून आलेल्या प्रेक्षकांमध्ये एकांकिकांच्या विषयाबद्दल चर्चा रंगली होती.

दुसऱ्या बाजूला पडद्यामागे पहिल्या एकांकिकेच्या कलाकारांची लगबग सुरू होती. वेशभूषा आणि रंगभूषा करण्यासाठी ही मंडळी कलाकारांना मदत करत होती. संगीत आणि प्रकाशयोजनेची चाचणी सुरू होती. काही जण रंगमंचावर घुटमळत जागेचा अंदाज घेत होते. मात्र, तिसरी घंटा होताच प्रेक्षागृहात पूर्णपणे शांतता पसरली. प्रेक्षकांचे डोळे रंगमंचावर स्थिरावले. टाळ्या आणि शिट्टय़ांच्या गजरात पडदा उघडला. पहिली एकांकिका सादर झाली कीर्ती महाविद्यालयाची ‘ठसका’. त्यानंतर रुईया महाविद्यालयाची ‘बद्रुकवाडीचा मारुती बाटला’, महर्षी दयानंद महाविद्यालयाची ‘अर्धविराम’, मुलुंड वाणिज्य महाविद्यालयाची ‘भाग धन्नो भाग’ आणि साठय़े महाविद्यालयाची ‘भूमी’ या एकांकिका सादर झाल्या.

प्रत्येक एकांकिका संपली की नेपथ्य आणि इतर सामान शिस्तीत बाहेर काढले जात होते. पुढील एकांकिकेसाठी कमी पडणाऱ्या सामानाची देवाण-घेवाण करत कलाकारांनी खिलाडू वृत्तीचे दर्शन घडवले. कोण जिंकणार याचे अंदाज जो-तो बांधत होता. मात्र, स्पर्धेत सहभागी सर्व एकांकिकांचे कौतुक प्रत्येकाच्या तोंडी होते.

प्रायोजक

लोकसत्ता आयोजित ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत लोकांकिका स्पर्धा ‘अस्तित्व’च्या सहकार्याने पार पडत आहे. ‘इंडियन ऑइल कॉपरेरेशन लिमिटेड’, ‘कमांडर वॉटर टेक प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘एम. के. घारे ज्वेलर्स’ पॉवर्ड बाय असलेल्या या स्पर्धेसाठी ‘मे. बी. जी. चितळे डेअरी’ आणि ‘झी टॉकीज’ असोसिएट पार्टनर आहेत. ‘झी टॉकीज’ या स्पर्धेसाठी प्रक्षेपण भागीदारदेखील आहे. लोकांकिकाच्या मंचावरील कलाकारांना चित्रपट-मालिकेत संधी देणारे ‘आयरिस प्रोडक्शन’ टॅलेंट पार्टनर आहेत.

भावनिक, विनोदी आणि सामाजिक असा विविध प्रकारचा आशय असलेल्या ‘लोकांकिका’ स्पर्धेत पाहायला मिळाल्या. या वर्षी मी पहिल्यांदाच आले आहे, पण आता दरवर्षी लोकांकिका पाहायला यायचे ठरवले आहे. – दिविषा म्हात्रे, प्रेक्षक

विभागीय अंतिम फेरीत निवड झालेल्या एकांकिकांची नावे बातमीत वाचली. म्हणून ही फेरी पाहायला येण्याचा निर्णय घेतला. वर्षभर झालेल्या इतर स्पर्धाच्या तुलनेत या स्पर्धेत वेगळ्या एकांकिका पाहायला मिळाल्या. – केतन कदम, प्रेक्षक

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Lokankika mumbai divison final round young people rush akp