अर्थव्यवस्थेत अल्पमोली पण बहुगुणी योगदानामुळे लघुउद्योगाकडे कौतुकाने पाहिले जाते. तथापि या कौतुकानुरूप मान आणि प्रतिष्ठा सोडाच, सापत्नभाव आणि उपेक्षाच लघुउद्योजकांच्या वाटय़ाला येते, हा सार्वत्रिक अनुभव आहे. सूक्ष्म आणि लघुउद्योग क्षेत्रापुढील ही आव्हाने समजून घेतानाच, त्याच्या सामर्थ्यांचा सर्वागीण आढावा ‘लोकसत्ता- बदलता महाराष्ट्र’च्या नवीन पर्वात घेण्यात येणार आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञ, अभ्यासक, धोरणकर्ते आणि प्रत्यक्ष उद्योजक यांच्या या विचारमंथनात सहभागी होण्याची संधी राज्यातील लघुउद्योजकांनाही लाभणार आहे. येत्या ११ आणि १२ सप्टेंबर रोजी मुंबईत हा परिसंवाद होणार आहे.

‘लोकसत्ता’ने आजवर ‘बदलता महाराष्ट्र’ उपक्रमाद्वारे विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चेसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. पाणी, शिक्षण, उद्योग, पर्यावरण, पायाभूत सुविधा, स्टार्टअप्स अशा विविध विषयांवरील या चर्चासत्रांत गेल्या दोन वर्षांत विचारमंथन झाले. त्यांचे सार धोरण व नियोजनकर्त्यांपर्यंत पोचविण्यात आले. आता याच मालिकेमध्ये लघू व मध्यम उद्योग क्षेत्रावर विचारमंथन करण्यात येणार आहे. हे देशात शेतीनंतर सर्वाधिक रोजगारनिर्मिती करणारे क्षेत्र आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात आणि निर्यातीतही या क्षेत्राचा सिंहाचा वाटा आहे. तरी वित्तपुरवठय़ाची समस्या, कुशल रोजगाराचा अभाव, जाचक नियमावली आणि मंजुऱ्या-परवान्यांचे बंध, उत्पादनांचे ब्रँडिंग, बौद्धिक संपदा व बाजारपेठेचा प्रश्न अशा नाना अडचणी या क्षेत्रापुढे आहेत. त्याचबरोबर या क्षेत्राला धोरणात्मक व सरकारी योजनांचे प्रोत्साहनही आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कल्पक उद्यमशीलता व दुर्दम्य जिद्दीतून प्रगतीची मोठी आसही यात दिसून येते. अनेकांनी यातून छोटेखानी सुरुवात करीत मोठा उद्योगवृक्ष उभारल्याची स्फूर्तिदायी उदाहरणे आहेत.  ‘लोकसत्ता- बदलता महाराष्ट्र’ उपक्रमाच्या दोन दिवसांत वेगवेगळ्या सहा सत्रांमध्ये या क्षेत्रातील अशा विविध पैलूंवर सखोल चर्चा करण्यात येणार आहे.

लघुउद्योजकांना आवाहन

उद्योजकतेत अग्रेसर आणि अनुकूल अशा महाराष्ट्र राज्यात गावागावांत उद्यमशीलतेचा जोम आहे. साधन, साहाय्य, मार्गदर्शन यातून नेमकी दिशा शोधणारेही अनेक आहेत. उद्योजक म्हणून कारकीर्द सुरू केलेल्यांना उत्कर्षांच्या, चर्चा-संवाद-संपर्क यांच्या वाढीच्या दृष्टीने ‘लोकसत्ता- बदलता महाराष्ट्र’ हे आदर्श व्यासपीठ ठरेल. त्यांनाही या उपक्रमात सहभागी होण्याची संधी ‘लोकसत्ता’ने खुली केली आहे. इच्छुक लघुउद्योजकांनी सहभागासाठी ं१३ँेंल्लं२@ी७स्र्१ी२२्रल्ल्िरं.ूे या ई-मेलवर संपर्क साधावा. त्यात आपले नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, तसेच आपल्या व्यवसाय-उपक्रमाचा तपशील, तसेच या परिसंवादातील सहभागामागील उद्दिष्ट थोडक्यात नमूद करावे.

  • सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्राविषयीचे विविध पैलू उलगडून दाखविणाऱ्या या दोन दिवसांच्या परिसंवादाचे सहप्रायोजक ‘एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड’ हे आहेत.
  • परिसंवादातील सहभागासाठी इच्छुक लघुउद्योजकांनी arthmanas@expressindia.com या इ-मेलवर माहितीसह संपर्क साधणे आवश्यक.