रात्री आठ-साडेआठची वेळ.. इतर महाविद्यालयांमधून नाटकाची तालीम आवरून थकलेभागले जीव घरी परतत असताना परळच्या डॉ. टी. के. टोपे महाविद्यालयातील वातावरणाला जाग येत असते. ‘हॅलो..हॅलो.. माइक चेक, चेक.. हॅलो हॅलो..’ करत महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी सिद्धेश माने ध्वनिक्षेपकाचा ताबा घेतो. सिद्धेश एका प्रसिद्ध सलूनमध्ये काम करतो. सलूनचे काम आटोपून आलेला सिद्धेश माइकचा ताबा घेतो तोच त्याचे सहकारीही जमू लागतात. नाटकाचा दिग्दर्शक संदीप दंडवते यांच्या गैरहजेरीत सिद्धेश, स्वप्निल पाथरे हे मार्गदर्शन करतात. मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीधंदा आटोपून बहुतेकजण थेट तालमीलाच आलेले असतात. या मुलांना काम आणि कॉलेज यादरम्यान सरावासाठी अवघा ३-४ तासांचा वेळ मिळतो. या वेळेचा उपयोग करून महाविद्यालयातील आजी-माजी विद्यार्थी एकत्र येऊन ‘लोकांकिका’ गाजवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. महाविद्यालयातील तिसऱ्या मजल्यावर ३००-३५० चौरस फुटांच्या एका वर्गात विद्यार्थ्यांची तालीम रंगते. ‘रंगदेवते’च्या प्रार्थनेने तालमीला सुरुवात होते. प्रत्यक्ष नाटकात काम करणारी मुले १०-१२ असतील. पण, तालमीची जागा सोडून अख्खा वर्ग खचाखच भरलेला. अनेक माजी विद्यार्थी मार्गदर्शक म्हणून तर आजी विद्यार्थी उत्सुकता, प्रोत्साहन द्यायला म्हणून दररोज तालमीला हजेरी लावतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकांकिकेत जाहीर सभेचे नेपथ्य असल्याने ८-९ टेबल, मोठे पडदे, हार, दोन भोंगे, ५-६ बांबू, ध्वनिक्षेपक अशी मांडणी विद्यार्थ्यांना करावी लागते. टेबल कसे उघडावे, स्टेज कसे बांधावे याचे प्रशिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी सुरुवातीला मंडपवाल्याला बोलावले. अवघ्या काही सेंकदात सभेकरिता मांडणी करताना विद्यार्थ्यांची चांगलीच दमछाक होते. परंतु, प्रत्येकजण त्याच्यावर सोपवलेली जबाबदारी उत्साहाने पार पाडतो.

अभिनयाची कोणतीही पाश्र्चभूमी नसलेले विद्यार्थी तालमीच्या वेळेस आवाजातील चढ-उतारांवरही एखाद्या प्रशिक्षित अभिनेत्यांप्रमाणे मेहनत घेताना दिसतात. लहानलहान चुका हेरून त्या सुधारण्यासाठी कष्ट घेण्याची विद्यार्थ्यांची तयारी कौतुकास पात्र ठरते. फक्त रात्री उशिरापर्यंत तालमी सुरू राहत असल्याने मुलींना सहभागी होता येत नाही. अनेकदा स्त्री पात्राची गरज असूनही या अडचणीमुळे त्याला कात्री लावावी लागते. परंतु, या अडचणी सोडल्या तरी टोपे महाविद्यालयातील वातावरण लोकांकिकामय झाल्याचेच दिसून येते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta ekankika
First published on: 09-12-2016 at 02:36 IST