मंगळवारी दादरमधील कार्यक्रमात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन
मिळकतीत जेमतेम वाढ, अमर्याद गतीने वाढत असलेले खर्च यांची तोंडमिळवणी करीत, भविष्यासाठी योजलेल्या उद्दिष्टांसाठी काही पैसा जमवायचा तर गुंतवणुकीचा आधार घेण्याशिवाय पर्यायच नाही. गुंतवणुकीचे उपलब्ध असलेले वेगवेगळे प्रकार, त्यांची परतावा कामगिरी, जोखीम आणि सुरक्षिततेचे घटक हे सर्व पडताळून गुंतवणुकीचे सुयोग्य गणित जुळवून देणारा ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ उपक्रम मंगळवारपासून सुरू होत आहे.
‘दिशा डायरेक्ट’ प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थसल्ला’चा पहिला कार्यक्रम मंगळवारी, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृह, शिवाजी पार्क, दादर येथे होईल. न्यू इंडिया अश्युरन्स कं. लि. या उपक्रमाची सह-प्रायोजक आहे. बँका-कंपन्यांच्या मुदत ठेवी, सरकारी रोखे व तत्सम स्थिर उत्पन्न देणारे गुंतवणूक पर्याय ते थोडी अधिक जोखीम घेत म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीच्या पर्यायांबाबत अनुभवी आर्थिक सल्लागार वसंत माधव कुळकर्णी या कार्यक्रमांत मार्गदर्शन करतील. भांडवली बाजारातील गुंतवणुकीचा सुमारे २० वर्षांचा अनुभव गाठीशी असलेले आशीष ठाकूर हे ‘शेअर बाजारातील गुंतवणुकीचे तंत्र व मंत्र’ उलगडून सांगतील. निवृत्तीपश्चात जीवनासाठी तजवीज म्हणून काय काळजी घ्यावी, गुंतवणुकीच्या पर्यायांचे विवेचन व्यावसायिक गुंतवणूक सल्लागार मिलिंद अंधृटकर हे करतील.
सभागृहाच्या आसनक्षमतेनुसार प्रवेश मर्यादित आणि प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार दिला जाईल.

कधी?
मंगळवार, २ फेब्रुवारी, सायंकाळी ५ वाजता
कुठे?
सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृह, शिवाजी पार्क, दादर