लोकसत्ता तरुण तेजांकित उपक्रमात विविध क्षेत्रांतील १२ तरुणांना गौरविण्यात येणार असून या सोहळ्याचे लोकसत्ताच्या फेसबुक पेजवर थेट प्रसारण करण्यात येणार आहे. त्यामुळे जगभरातील मराठी जनांना हा सोहळा पाहता आणि अनुभविता येईल. शनिवार, ३१ मार्च रोजी मुंबईत होणाऱ्या एका शानदार सोहळ्यात उद्योगपती बाबा कल्याणी आणि केंद्रिय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते तरुण तेजांकित पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

संध्याकाळी सव्वा सहा वाजल्यापासून ‘लोकसत्ता’च्या http://www.facebook.com/LoksattaLive या फेसबुक पेजवरून कार्यक्रमाचे थेट प्रसारण पाहता येणार आहे. ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायक पं. अजय पोहनकर तसेच फ्यूजन संगीतकार आणि कीबोर्डवर शास्त्रीय संगीताचे वादक म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केलेले त्यांचे सुपत्र अभिजित पोहनकर या पिता-पुत्राची स्वरसाथ या सोहळ्याला लाभली आहे. सोहळ्याचे सूत्रसंचालन अभिनेता जितेंद्र जोशी करणार आहे.

वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या ४० वर्षांच्या आतील तरुणांकडून ‘लोकसत्ता’ने स्वनामांकन पत्र मागविले होते. संपूर्ण महाराष्ट्रातून पाचशे स्वनामांकन पत्रे ‘लोकसत्ता’कडे आली. यातून अंतिम १२ तरुण तेजांकितांची निवड करण्याचे काम ‘प्राइसवॉटरहाऊस कुपर्स’ या आंतरराष्ट्रीय विश्लेषण संस्थेच्या साहाय्याने विविध क्षेत्रातील एका निष्पक्ष तज्ज्ञ समितीने केले. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, एलआयटी फायनान्स होल्डिंगचे माजी अध्यक्ष वाय. एम. देवस्थळी, स्नेहालय या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. गिरीश कुलकर्णी, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार वि. वि. करमरकर आणि ज्येष्ठ रंगकर्मी कमलाकर सोनटक्के या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा या निवड समितीत सहभाग होता.

आजच्या वर्तमानातही समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांत अनेक तरुण मंडळी आपापल्या परीने काम करत आहेत. त्यांचे हे काम इतरांसाठी आदर्श आणि प्रेरणादायी आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणारी ही तरुणाई आणि त्यांची सकारात्मक ऊर्जा समाजापुढे ठळकपणे आणण्यासाठी ‘लोकसत्ता’ने हा उपक्रम सुरू केला आहे. उपक्रमाचे यंदा पहिले वर्ष असून समाजातील तरुणांच्या या सकारात्मक ऊर्जेला आणि कर्तृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम यापुढेही सुरू राहणार आहे.