‘लोकसत्ता तरुण तेजांकित’चे दुसरे पर्व; निवड प्रक्रिया, वेळापत्रक लवकरच

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तरुणाईच्या सर्जनशीलतेला, धडपड करण्याच्या जिद्दीला दाद देणाऱ्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ उपक्रमाचे दुसरे पर्व सुरू झाले आहे. नवनिर्मिती करणाऱ्या तरुणाईच्या या कौतुक सोहळ्याचे यंदाचे दुसरे पर्व आहे. या पर्वाच्या निवड प्रक्रियेचे तपशील आणि वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

साहित्य, कला, विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक कार्य, प्रशासन अशा अनेक क्षेत्रांत तरुण पाय रोवून काम करत आहेत. विचारांना कृतीची जोड देत परिस्थिती बदलू पाहत आहेत. ‘नवी पिढी’ काही करत नाही ही पिढय़ान्पिढय़ा होणारी तक्रार अनेकांनी आपल्या कार्यातून खोटी ठरवली आहे. भविष्य घडवणाऱ्या वर्तमानातील तरुणाईच्या ऊर्जेचे, त्यांच्या परिश्रमाचे कौतुक ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ या उपक्रमातून करण्यात येते. ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ या उपक्रमाचे सारस्वत बँक सहप्रायोजक असून एम. के. घारे ज्वेलर्स ‘पॉवर्ड बाय’ पार्टनर आहेत.

गेल्या वर्षी या उपक्रमांतर्गत १२ तरुण ऊर्जावंतांचा गौरव करण्यात आला. कचऱ्याला जीवनोपयोगी घटकांत बदलणारे सौरभ पाटणकर, धान्यातील जीवनसत्त्वावर संशोधन करणाऱ्या अमृता हाजरा, हवेतील आद्र्रतेचे पिण्याच्या पाण्यात रूपांतर करणारे उपकरण तयार करणारा जव्वाद पटेल, दीपस्तंभ संस्थेच्या माध्यमातून अपंग विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे यजुवेंद्र महाजन, अनाथाश्रमाच्या माध्यमातून मुलांसाठी काम करणारे सागर रेड्डी, सावरपाडा एक्स्प्रेस कविता राऊत, धावपटू ललिता बाबर, फॅशन विश्वात ओळख निर्माण करणाऱ्या वैशाली शडांगुळे, तंत्रज्ञानाच्या मदतीने बालमृत्यू कमी करण्यासाठी कार्यरत असणारे शंतनू पाठक, दूरचित्रवाणी आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांमध्ये नावीन्यपूर्ण विषय हाताळणीसाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी, मनोरंजनातूनही सामाजिक भान जपणारे निर्माते राहुल भंडारे, मालिका, नाटय़, चित्रपट क्षेत्रात अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री मुक्ता बर्वे यांचा गेल्या वर्षी ‘तरुण तेजांकित’ म्हणून गौरव करण्यात आला होता.

या लखलखत्या हिऱ्यांचे यंदाचे शोधपर्व सुरू झाले आहे. त्याबाबतचे तपशील लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. राज्यभरातून आलेल्या अर्जातून नामवंतांची समिती ‘तरुण तेजांकित’साठी तरुणांची निवड करणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta tarun tejankit award
First published on: 30-12-2018 at 00:09 IST