स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना भारतीय परराष्ट्र सेवांमधील पदे आकर्षित करीत असली, तरीही या नोकरीमधील नेमकी आव्हाने, संधी, अधिकार याविषयी फार त्रोटक माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोचत असते. परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांकडूनच देशातील या सन्मानाच्या आणि प्रतीष्ठेच्या नोकरीबद्दल अधिक जाणून घ्यायची संधी व्हिवा लाउंजच्या पुढच्या पर्वात मिळणार आहे. आयएफएस अधिकारी डॉ. स्वाती कुलकर्णी यांच्याशी थेट संवाद साधायची संधी उपस्थितांना या  कार्यक्रमात मिळेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या स्त्रियांना लोकसत्ता व्हिवा लाउंजच्या मंचावर आमंत्रित करण्यात येते. या मंचावर प्रथमच एक आयएफएस अधिकारी येणार आहे. १९९५च्या बॅचच्या आयएफएस अधिकारी असणाऱ्या डॉ. स्वाती कुलकर्णी सध्या मुंबईतच  विभागीय पारपत्र अधिकारी म्हणून कार्यरत असून यापूर्वी त्यांनी दक्षिण आफ्रिका, ओमान, ब्रिटन, मॉरिशस आणि स्पेनमध्ये भारतीय दूतावासांत अधिकारी म्हणून काम केले आहे. मुंबईत येण्याअगोदर त्या दक्षिण आफ्रिकेत केपटाऊनमध्ये भारताच्या कौन्सेल जनरल (वाणिज्यदूत) म्हणून कार्यरत होत्या. ओमानमध्ये (मस्कत) भारतीय मिशनच्या उपप्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले आहे. मॉरिशसमध्ये भारताच्या उच्चायुक्त कार्यालयातील प्रथम सचिव म्हणून त्या कार्यरत होत्या. स्पेन येथील भारतीय दूतावासातील तृतीय सचिव म्हणून त्यांची परदेशातील कारकीर्द सुरू झाली. दिल्लीत साऊथ ब्लॉकमध्ये परराष्ट्र मंत्र्यांच्या अतिरिक्त स्वीय सचिव म्हणून त्यांनी काम केले आहे. शिवाय पुण्यातही पासपोर्ट ऑफिसर म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

डॉ. स्वाती कुलकर्णी यांनी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एम.बी.बी.एस. ही पदवी मिळवल्यानंतर स्पर्धा परीक्षेतील करिअर संधी स्वीकारली. केसरी प्रस्तुत व्हिवा लाउंज हा कार्यक्रम बुधवारी (दि. २५जानेवारी) मुंबईत होणार असून प्रथम येणाऱ्या प्रथम संधी या तत्त्वावर प्रवेश मिळेल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta viva lounge
First published on: 22-01-2017 at 02:11 IST