बारा वर्षांपूर्वी दिग्दर्शक मधुर भांडारकर याच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपप्रकरणी सत्र न्यायालयाने सुनावलेल्या तीन वर्षांच्या शिक्षेविरोधात मॉडेल प्रीती जैन हिने उच्च न्यायालयात धाव घेतली असून न्यायालयानेही तिचे अपील दाखल करून घेतले आहे. एवढेच नव्हे, तर शिक्षेचे कालावधी कमी असल्याने निकाल सुनावल्यानंतर सत्र न्यायालयाने लगेचच तिची जामिनावर सुटका केली होती. उच्च न्यायालयाने तिच्या जामिनाची मुदत ७ जूनपर्यंत वाढवली आहे.
चित्रपटात भूमिका देण्याचे आमिष दाखवून भांडारकर याने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप २००४ मध्ये जैन हिने केला होता. परंतु या प्रकरणातून निर्दोष सुटका झाल्यावर भांडारकर यानेच तिच्याविरोधात हत्येचा कट रचल्याची तक्रार केली होती. या प्रकरणी प्रीतीसह तिचा साथीदार आणि गुन्हेगारीकडून राजकारणाकडे वळलेल्या अरुण गवळीच्या टोळीचा गुंड नरेश परदेशी यालाही न्यायालयाने दोषी ठरवीत तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. तसेच या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी चार आठवडय़ांची मुदत देत शिक्षा स्थगित केली होती.
सत्र न्यायालयाने आपल्याला दोषी ठरवण्यात चूक केली आहे, असा दावा करीत जैन हिने शिक्षेच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. एवढेच नव्हे, तर सत्र न्यायालयाने आपल्या निकालात गुन्हा योग्य पद्धतीने नोंदवण्यात आलेला नाही. शिवाय आपण हत्येचा कट रचण्यामागील हेतू सरकारी पक्षाला सिद्ध करता आलेला नाही, असेही नमूद केल्याचा दावाही जैन हिने अपिलात केला आहे. न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या सुट्टीकालीन न्यायालयासमोर जैन हिच्या अपिलावर सोमवारी सुनावणी झाली. त्या वेळेस त्यांनी तिचे अपील दाखल करून घेत जामिनाची मुदत ७ जूनपर्यंत वाढवली.