मुंबई महानगरपालिकेत विनासायास शिवसेनेचा महापौर आणि उपमहापौर बसून दिल्यामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यातील कुरबुरी कमी होतील, हा अंदाज साफ फोल ठरल्याचे गुरूवारी विधिमंडळाच्या अधिवेशनात दिसून आले. मुंबई महानगरपालिकेत बुधवारी महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. मात्र, दुसऱ्याच दिवशी शिवसेनेने पुन्हा एकदा विधिमंडळात भाजपविरोधी भूमिका घेतली. विशेष म्हणजे या सगळ्या नाट्यात भाजपचेही काही आमदार सहभागी झाले होते. त्यामुळे विधिमंडळाच्या आवारात शिवसेना-भाजप हे सत्ताधारीच एखाद्या मागणीसाठी घोषणाबाजी करत असल्याचे अनोखे चित्र पाहायला मिळाले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली.

कर्जमाफीसाठी राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे लक्ष विधान भवनाकडे लागले आहे. आम्ही १५ वर्ष सत्तेत होतो तेव्हा निर्णय घ्यायचो. मागण्यांसाठी आमचेच आमदार वेलमध्ये यायचे नाहीत. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांनी भाजप आमदारांना सांगावे की, याप्रकरणात भाजपने राजकारण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करु नये. अशाप्रकारचे राजकारण न कळण्याएवढे महाराष्ट्रातील शेतकरी दुधखुळे नाहीत, असा टोला अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. सत्ताधाऱ्यांना शेतकरी कर्जमाफीवर आंदोलन करण्याची उपरती अचानक कशी काय झाली? आंदोलन करण्यापेक्षा थेट कर्जमाफीच करा. कर्जमाफीशिवाय सभागृहाचे कामकाज होऊ देणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिला. कोणीही शब्दांचे खेळ करण्याचे प्रयत्न करु नये. आम्ही कर्जमाफीची मागणी श्रेयासाठी करत नाही. पाण्याची पातळी किती खोल जातेय. ‘जलयुक्त शिवार’चा टेंभा मिरवला, पण तरीही टँकरची मागणी होतेय, जाहिरातबाजी आणि घोषणाबाजी करुन प्रश्न सुटत नाही, अशा शब्दांत सरकारचे वाभाडे काढले.

शेतकरी कर्जमाफीवरून विरोधकांनी बुधवारीही विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले. ‘शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, भाजप सरकार हाय हाय, उद्योगपती तुपाशी – शेतकरी उपाशी, गाजरवाल्या सरकारचा धिक्कार असो, मोदी दौऱ्यावर – शेतकरी फासावर’ अशा घोषणांनी विरोधकांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला. कर्जमाफीच्या मुद्दय़ावर धरसोड भूमिका घेणाऱ्या शिवसेनेलाही विरोधकांनी सोडले नव्हते. त्यानंतर आज शिवसेनेच्या भूमिकेत अचानकपणे बदल झालेला पाहायला मिळाला.

अजित पवार यांनी काल विधानसभेत कर्जमाफी केल्यास चंद्रकांतदादा पाटील यांना मुख्यमंत्री करू, असेदेखील म्हटले होते. विरोधी पक्षात असताना कर्जमाफीच्या मुद्यावर तुमची भाषा कशी होती? मात्र, आता सत्तेत आल्यानंतर लाल दिव्याची उब लागल्याने त्यांची भाषा बदलली आहे. चंद्रकांत पाटील आता सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री बनले आहेत. त्यामुळे त्यांनी खमकेपणाने निर्णय घेतले पाहिजेत. त्यांनी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले तर आम्ही सर्वजण मिळून त्यांना मुख्यमंत्री करू, असे सांगत पवार यांनी पाटलांना चिमटा काढला होता.