भीमा कोरेगाव हिंसाचारात सहभागी असल्याच्या संशयावरून शनिवारी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) सात जणांना ताब्यात घेतले. या सर्वांचा सीपीआय (माओवादी) या संघटनेशी संबंध असल्याचे समजते. एटीएसला शुक्रवारी कल्याण स्टेशनवर एक नक्षलवादी कार्यकर्ता येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर एटीएसच्या एका पथकाने कल्याण स्थानकात जाऊन या कार्यकर्त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरूवातीला हा व्यक्ती समाधानकारक उत्तरे देत नव्हता. मात्र, आणखी कसून चौकशी केल्यानंतर त्याने पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली. घाटकोपरच्या कामराज नगर, रमाबाई आंबेडकर नगर आणि विक्रोळी परिसरात आपले सहकारी आहेत. हे सर्वजण सीपीआय (माओ) संघटनेसाठी काम करतात. यानंतर एटीएसच्या पथकांनी या सर्वांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले. यानंतर झालेल्या चौकशीत दोन जण सीपीआयचे (माओ) सक्रिय सदस्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, पोलिसांनी या संशयितांची नावे अद्यापही उघड केलेली नाहीत. या सर्वांची रवानगी १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.

माओवाद्यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागांमध्ये नक्षलवादी चळवळीचे पुनरुज्जीवन करण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता. या परिसरातील औद्योगिक परिसरात आपल्या विचारसरणीचा प्रसार करण्याचे उद्दिष्ट नक्षलवादी नेत्यांनी समोर ठेवले होते. कल्याणमधून अटक करण्यात आलेला मुख्य नक्षलवादी आणि त्याचे काही सहकारी यासाठी काम करत होते. नक्षलवाद्यांच्या महाराष्ट्र-गुजरात गोल्डन कॉरिडोअर समितीचे सदस्य असणारे हे सर्वजण वन विभागातील नक्षलवाद्यांशी संपर्क राखून असल्याची माहिती एटीएसने दिली.

या सात जणांचा भीमा कोरेगाव हिंसाचार आणि महाराष्ट्र बंदच्यावेळी झालेल्या जाळपोळीच्या घटनांमध्ये सहभाग असल्याचा संशय आहे. हे सर्वजण आंध्र प्रदेशच्या नालगोंदा आणि करीनगर या भागात राहणारे आहेत. एटीएसने त्यांच्या घरावर छापे टाकले तेव्हा त्याठिकाणी काही बॅनर्स आणि भीमा कोरेगावसंबंधी मजकूर असलेली कागदपत्रे मिळाली आहेत. त्यामुळे भीमा कोरेगाव येथील हिंसाचारात त्यांचा सहभाग असल्याचा संशय बळावला आहे. सध्या काळाचौकी परिसरात या सर्वांची कसून चौकशी सुरू आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भीमा कोरेगाव, सणसवाडीतील हिंसाचार प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मुंबई हायकोर्टाच्या विद्यमान न्यायमूर्तींमार्फत ही चौकशी केली जाणार आहे. भीमा कोरेगाव येथे सोमवारी विजयस्तंभाला मानवंदनेचा कार्यक्रम सुरु असतानाच दुपारी समाजकंटकांनी सणसवाडी, भीमा कोरेगाव येथे वाहनांवर दगडफेक केली होती. या हिंसाचाराचे पडसाद राज्यभर उमटले असून मंगळवारी राज्यात मुंबईतील गोवंडी, मुलुंड, चेंबूर, तसेच पुणे, औरंगाबाद, अहमदनगर या शहरांमध्ये हिंसाचाराविरोधात आंदोलन झाले होते.