मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये सभा पार पडणार असून यावेळी ते राज्य सरकारवर पुन्हा एकदा जोरदार टीका करण्याची शक्यता आहे. दरम्यान राज ठाकरेंच्या सभेआधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. असे भोंगेधारी, पुंगीधारी फार पाहिले आहेत अशा शब्दांत त्यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंवर टीका केली आहे. आगामी महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणाचा चौकोनी आढावा घेणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या वेब-उपक्रमाच्या समारोप सत्रात बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील सध्याच्या घडामोडींवर आपली सविस्तर भूमिका मांडली.

“करोनामुळे २ वर्षे नाटक, चित्रपट बंद, आता फुकटात करमणूक मिळत असेल तर का नको?”, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर निशाणा

हिंदुत्वाचं वातावरण निर्माण होत असून एक नवा खेळाडू येत असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, “अशा खेळाडूंकडे मी लक्ष देत नाही. कारण असे खेळाडू कोणत्या मैदानांमध्ये कोणते खेळ करतात हे आतापर्यंत लोकांनी अनुभवलं आहे. कधी मराठीचा, हिंदुत्वाचा खेळ सुरु आहे. असे खेळ महाराष्ट्राच्या जनेतेने पाहिले आहेत”.

…मग भोंगाबंदी देशभर करा ना – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

“दोन वर्षांचा कालखंड प्रचंड मोठा आहे. त्या कालखंडात सर्व बंद होतं. नाटक, थिएटर, सिनेमा सगळं बंद होतं. त्यामुळे आता फुकटात करमणूक करून मिळत असेल तर का नको?” असा टोलाही त्यांनी राज ठाकरेंचं नाव न घेता लगावला.

“मी शिवेसनेची ओळख करुन देण्याची गरज नाही. शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आहे हे मी विधानसभेतही बोललो आहे आणि ते लपवण्याची गरज नाही. आता काहीजण हे करुन बघू ते करुन बघू बोलत आहेत. सध्या मार्केटिंगचा जमाना आहे. नाही आवडलं तर परत करा. तसंच हे फळलं तर ठीक नाही तर परत. गाजराची पुंगी वाजली तर वाजली. असे भोंगेधारी, पुंगीधारी फार पाहिले आहेत,” अशी टीका यावेळी त्यांनी केली.

मुख्य प्रायोजक : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
सहप्रायोजक : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ