शिवाजी पार्कवरील गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणावरून लक्ष्य ठरलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मंगळवारी ठाण्यात ‘उत्तर सभा’ झाली. यावेळी त्यांनी प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर राज्यात जातीयवाद बोकाळला, या वक्तव्याचा राज यांनी पुनरुच्चार केला. यावेळी त्यांना पवार कुटुंबावर गंभीर आरोप केले. दरम्यान त्यांच्या या आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना उत्तर दिलं आहे.

राज ठाकरे काय म्हणाले?

सुप्रिया सुळे यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे ‘सुळे’ वेगळे आहेत, अशी टीका राज यांनी केली़ अजित पवार यांच्यावर छापेमारी होते, पण, सुप्रिया सुळे यांच्यावर अशी कारवाई होत नाही. आपल्याच पक्षातील नेत्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पवार हे मोदींना भेटत तर नसावेत ना, असा टोलाही त्यांनी लगावला.

“शरद पवारांनी आवाज काढला आणि अजित पवारांना कानात…”, सकाळच्या शपथविधीवरून राज ठाकरेंचा टोला!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज ठाकरेंच्या भोंग्याबाबतच्या भूमिकेवर टीका केली होती. “राज ठाकरेंना आत्ताच भोंगे दिसले का?” असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला होता. त्यावरून राज ठाकरेंनी निशाणा साधला आहे. “आमचे लाडके अजित पवार काय म्हणतायत बघा. त्यांचा आवडता शब्द आहे ‘पठ्ठ्या’.काय म्हणे भोंगे आत्ताच दिसले का? याच्याआधी म्हणे झोपा काढत होतात का? अजित पवार, मी कधी कुठली गोष्ट बोललोय, हे मला नीट आठवतंय. तुमच्या माहितीसाठी फक्त ३ व्हिडीओ आणले आहेत. मी याआधीही यावर बोललो होतो. पण त्याचे मला काही व्हिडीओ सापडले नाहीत. सोक्षमोक्ष लावलेला बरा असतो”, असं म्हणत राज ठाकरेंनी भोंगे उतरवण्याबाबत याआधी त्यांनीच केलेल्या विधानांचे तीन व्हिडीओ वाजवून दाखवले.

“शपथविधीनंतर शरद पवारांनी आवाज काढला”

राज ठाकरेंनी सकाळच्या वेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीची आठवण करून दिली. “तो जो सकाळचा शपथविधी झाला, त्यानंतर शरद पवारांनी जो आवाज काढला, त्यानंतर अजित पवारांना तीन-चार महिने ऐकू येत नव्हतं काही. त्यानंतर त्यांना कानात कूं-कूं असा आवाज ऐकू येत होता. त्यामुळे मी जे काही बोललो, ते त्यांना कळलंच नाही”, असं राज ठाकरे म्हणाले.

“लॉकडाऊनमध्ये त्यांचा कान साफ झाला”

दरम्यान, लॉकडाऊननंतर अजित पवारांचा कान साफ झाला, असा टोला राज ठाकरेंनी लगावला आहे. “लॉकडाऊनमध्ये अजित पवारांचा कान साफ झाला असणार. गुढी पाडव्याचा भोंगा त्यांना ऐकू आला”, असं ते म्हणाले.

अजित पवारांचं प्रत्युत्तर –

अजित पवार धनंजय मुंडेंना भेटण्यासाठी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात पोहोचले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांना राज ठाकरेंच्या आरोपांसंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “मी धनंजय मुंडेंना भेटण्यासाठी आलो आहे. आज वेगळ्या कारणासाठी आलो आहे. तुम्ही कोणीतरी काहीतरी बोलणार आणि त्याबद्दल विचारणार. त्यांना फार महत्व देऊ नका. माझ्या दृष्टीने धनंजय मुंडेंची प्रकृती जास्त महत्वाची आहे. माझा सहकारी अॅडमिट असून त्याला भेटण्यासाठी आलो आहे.”

योग्य वेळी उत्तर देईन, त्याची काळजी करु नका. माझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे असंही यावेळी ते म्हणाले.

आव्हाडांचं प्रत्युत्तर –

“त्यांनी माझ्यावर वैयक्तिक टीका केली आहे की माझं तोडं काहीतरी नागाच्या फण्यासारखं दिसतं. अशा वैयक्तिक कोट्या तर कोणालाही करता येतात. ते मिमिक्री आर्टिस्टचं काम आहे. पण ज्याच्यात प्रगल्भता आहे, जो समोरच्यांचा आादर करतो जे महाराष्ट्राच्या मातीची शिकवण आहे, ज्याची समाजात प्रतिष्ठा आहे त्यांना मी अरे तुरे करत नाही. माझा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे असं जर तुम्ही म्हणाल तर मग तुमचा चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागासारखा आहे हे म्हणावं का? तो भाग कोणता हे महाराष्ट्र ओळखतो,” असं प्रत्युत्तर आव्हाडांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलं.

‘‘शरद पवार हे नेहमीच आपल्या भाषणात महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकरांचा आहे, असे म्हणतात. पण, त्याआधी हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. मुसलमानांची मते मिळणार नाहीत, या भीतीने पवार छत्रपतींचे नाव घेत नाहीत’’, अशी टीका राज यांनी केली आहे. त्यावरही आव्हाडांनी भाष्य केलं.

“”शाहू, फुले, आंबेडकर हे छत्रपतींच्या विचारांचे वारसदार होते हे यांना कळलंच नाही, कारण यांनी बहुजन समाजाचा इतिहास वाचला नाही. हे नेहमी पुरंदरेंचा इतिहास वाचत गेले. ज्या पुरंदरेंनी जेम्स लेनला माहिती देऊन आमचया जिजाऊंची बदनामी केली ते यांचे आदर्श. इंग्लंडहून आलेला माणूस आमच्या जिजाऊंची बदानीमी करतो, चारित्र्यावर शिंतोडे उडवतो, चारित्र्यावर संशय व्यक्त करतो…पान नंबर ९३, परिच्छेद क्रमांक ४ यामध्ये काय लिहिलं आहे ते वाचा,” असा सल्ला जितेंद्र आव्हाडांनी दिला आहे.

“त्यांनी पुस्तकात १२ लोकांचे आभार मानले असून त्यात एक नाव बाबासाहेब पुरंदरेंचं आहे. मग ही माहिती कोणी दिली? पुस्तक छापण्याआधी वाचण्यासाठी दिलं जातं ते बाबासाहेब पुरंदरेंना वाचता नाही आलं? आज ते मृत आहेत. त्यांचा मी सन्मान करतो, त्यांच्याबद्दल काही बोलायचं नव्हतं. मृत्यू झाल्यावर आपण विसरुन जातो, पण तुम्ही आठवण करुन देऊ नका. तुम्ही ज्यांची शिकवण घेऊन शिकलात त्यांची पुस्तकं वाचा,” असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.