ठाण्यात झालेल्या मनसेच्या उत्तर सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर तुफान टोलेबाजी केली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जातीपातीच्या राजकारणावरून तोंडसुख घेतानाच राज ठाकरेंनी सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला. त्यासोबतच पवार कुटुंबीयांचे निकटवर्तीय असणारे पक्षातील जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यांच्यावर टीका करतानाच शिवसेना प्रवक्ते-खासदार संजय राऊतांवरही राज ठाकरेंनी खोचक शब्दांत टोला लगावला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज ठाकरेंनी सकाळच्या वेळी झालेल्या ‘त्या’ शपथविधीची आठवण करून दिली.

अजित पवारांनी भोंग्याच्या मुद्द्यावरून केली होती टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज ठाकरेंच्या भोंग्याबाबतच्या भूमिकेवर टीका केली होती. “राज ठाकरेंना आत्ताच भोंगे दिसले का?” असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला होता. त्यावरून राज ठाकरेंनी निशाणा साधला आहे. “आमचे लाडके अजित पवार काय म्हणतायत बघा. त्यांचा आवडता शब्द आहे ‘पठ्ठ्या’.काय म्हणे भोंगे आत्ताच दिसले का? याच्याआधी म्हणे झोपा काढत होतात का? अजित पवार, मी कधी कुठली गोष्ट बोललोय, हे मला नीट आठवतंय. तुमच्या माहितीसाठी फक्त ३ व्हिडीओ आणले आहेत. मी याआधीही यावर बोललो होतो. पण त्याचे मला काही व्हिडीओ सापडले नाहीत. सोक्षमोक्ष लावलेला बरा असतो”, असं म्हणत राज ठाकरेंनी भोंगे उतरवण्याबाबत याआधी त्यांनीच केलेल्या विधानांचे तीन व्हिडीओ वाजवून दाखवले.

“शपथविधीनंतर शरद पवारांनी आवाज काढला”

राज ठाकरेंनी सकाळच्या वेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीची आठवण करून दिली. “तो जो सकाळचा शपथविधी झाला, त्यानंतर शरद पवारांनी जो आवाज काढला, त्यानंतर अजित पवारांना तीन-चार महिने ऐकू येत नव्हतं काही. त्यानंतर त्यांना कानात कूं-कूं असा आवाज ऐकू येत होता. त्यामुळे मी जे काही बोललो, ते त्यांना कळलंच नाही”, असं राज ठाकरे म्हणाले.

“ये, शेपूट धरून गरगर फिरवतो आणि फेकून देतो”, राज ठाकरेंचं जितेंद्र आव्हाडांना खुलं आव्हान!

“लॉकडाऊनमध्ये त्यांचा कान साफ झाला”

दरम्यान, लॉकडाऊननंतर अजित पवारांचा कान साफ झाला, असा टोला राज ठाकरेंनी लगावला आहे. “लॉकडाऊनमध्ये अजित पवारांचा कान साफ झाला असणार. गुढी पाडव्याचा भोंगा त्यांना ऐकू आला”, असं ते म्हणाले.

“शरद पवार साहेब, काय चाललंय? तुमच्यासारख्या बुजुर्ग माणसाने…”, राज ठाकरेंचा थेट शरद पवारांवर निशाणा!

“मी चुकीचं काय बोललो?”

“मशिदींवरच्या भोंग्यांचा आख्ख्या देशाला त्रास होतोय. यात धार्मिक विषय कुठंय? तुम्हाला जी आजान द्यायचीये, ती घरात द्या. शहरांचे रस्ते, फुटपाथ कशाला अडवताय? प्रार्थना तुमची आहे. आम्हाला का ऐकवताय? सांगून तुम्हाला समजत नसेल, तर तुमच्या मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार”, अशा शब्दांत राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.