मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देलेल्या आश्वासनानंतर कर्मचारी व शिक्षकांचा संप स्थगित करण्यात आला. राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष अशोक दगडे, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अशोक थूल व सरचिटणीस उमेशचंद्र चिलबुले यांनी संयुक्त पत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य सरकारी कर्मचारी व शिक्षकांना जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करावी यासह दीर्घकाळ प्रलंबित असणाऱ्या इतर मागण्यांसाठी  २३ व २४ फेब्रुवारीला संप घोषित केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याची दखल घेऊन मंगळवारी संबंधित कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे त्यांनी आश्वासन दिले. त्यानंतर बुधवारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली व संप तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.