मुंबई : ऐन शेतीमाल काढणीच्या काळात बाजारात शेतीमालाची आयात वाढून दरात मोठी पडझड होते. दरातील पडझडीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात पुणे येथे कापूस, हळद आणि मका या पिकांसाठी ‘हेजिंग डेस्क’ सुरू करण्यात आला आहे. याद्वारे दरातील पडझड रोखून शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
राज्याच्या सकल उत्पन्नात कृषीचा वाटा १२ टक्के आहे. मात्र शेती पिकांचे उत्पादन अजूनही नैसर्गिक घटकांवर अवलंबून असते. चांगले उत्पादन होऊनही मालाला योग्य भाव मिळेल का याची चिंता नेहमीच असते. या उपक्रमामुळे शेतकरी त्यांच्या उत्पादनांच्या भविष्यातील किमतीतील चढ – उतारामुळे होणारे नुकसान टाळू शकतात. सेबीचे नियंत्रण असलेली एनसीडीईएक्स संस्थेच्या कमोडिटी मार्केट्स आणि संशोधन संस्थेने (एनआयसीआर) या प्रकल्पासाठी सहकार्य केले आहे. हा उपक्रम कृषी क्षेत्रातील विकासाच्या दिशेने एक महत्वाचा पाऊल आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांना बाजारपेठेतील ज्ञान मिळण्यासाठी बाजारातील अनिश्चिततेपासून वाचविण्यासाठी एक केंद्रीत समर्पित कृषी ‘हेजिंग डेस्क’ पुणे येथे स्थापन करण्यात आला आहे. एनसीडीईएक्स आणि स्मार्ट प्रकल्प यांच्यात ‘हेजिंग डेस्क’ बाबत करार झाला. या कराराचे नाव शेतकरी उत्पादक संघटनासाठी ‘हेजिंग डेस्क’ची स्थापना, असे आहे. यामध्ये कापूस, हळद आणि मका ही पिके पिकवणाऱ्या पट्ट्यांमधील शेतकरी उत्पादक संघटना आणि शेतकऱ्यांवर अधिक लक्ष देण्यात येईल.
हिंगोली, वाशिम, सांगली, यवतमाळ, अकोला, नांदेड, अमरावती, औरंगाबाद, बीड येथील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. या मार्फत शेतकरी उत्पादक संघटना, क्लस्टर आधारित व्यवसाय संघटनांना तज्ज्ञ सल्ला सेवा कमोडिटी कराराबद्दल माहिती देईल. तीन हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांना ‘हेजिंग’ साधने आणि धोरणांवर प्रशिक्षण दिले जाणार आहे. बाजार ट्रेंड, पुरवठा – तारणातील बदल जागतिक किमतींवर ‘रिअल-टाइम मार्केट इंटेलिजन्स’ची माहिती दिली जाईल. शेतकरी उत्पादक संघटनाना व शेतकऱ्यांना शेताजवळ साठवणूक केंद्रे उभारण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.
‘हेजिंग डेस्क’ म्हणजे काय
हेज म्हणजे बाहेरून येणाऱ्या संकटांपासून संरक्षण देण्यासाठी, त्यांना अटकाव करण्यासाठी बांधलेले साधन. भविष्यकाळातील कमी होणाऱ्या किंमतींपासून निर्माण होणारी जोखीम कमी करणे हा हेजिंगचा मुख्य उद्देश आहे. भविष्यकाळातील वाढणाऱ्या किंमतीचा फायदा घेण्यासाठी ऑप्शन ट्रेडिंगचा वापर केला जाऊ शकतो. जागतिक बँकेच्या सल्ल्यानुसार आणि प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यानुसार शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी शेतमालाच्या किंमतीतील जोखीम कमी करण्यासाठी वायदे बाजारात सहभागी होण्याकरिता तसेच त्यांना या बाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यासाठी ‘हेजिंग डेस्क’ सुरु करण्यात आला आहे.