मुंबई : तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राज्यात स्वातंत्र्यदिनापासून महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात नवसंकल्पना घेऊन येणाऱ्या युवक-युवतीना प्रशिक्षण तसेच त्यांच्या संकल्पनांचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर उत्तम संकल्पना सादर करणाऱ्या १३४ युवकांना एक लाख रुपयांपर्यतची पारितोषिकेही दिली जाणार आहेत, अशी माहिती विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा यांनी दिली. 

मुंबईतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तर नागपूर येथून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या यात्रेचा शुभारंभ होणार आहे. त्याचबरोबर अमरावती, औरंगाबाद, नाशिक आणि पुणे येथूनही त्या त्या विभागातील यात्रेचा स्वातंत्र्यदिनी शुभारंभ होणार आहे. तळागाळातील व ग्रामीण दुर्गम भागातील नवउद्योजकांचा आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेणे, नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ज्ञ मार्गदर्शन, निधी आणि आवश्यक पाठबळ पुरविणे तसेच राज्याची उद्योजकता व नाविन्यपूर्ण परिसंस्था बळकट करणे असा या यात्रेचा उद्देश असल्याचे वर्मा यांनी सांगितले.या यात्रेतील मोबाईल व्हॅन ही राज्यातील प्रत्येक तालुक्यातील शाळा, महाविद्यालये, आयटीआय आदी ठिकाणी जाऊन उद्योजकता आणि स्टार्टअपविषयी जनजागृती करेल. नाविन्यपूर्ण कल्पना असलेल्या नागरिकांची नोंदणी करुन त्यांना माहिती देण्यात येईल.