scorecardresearch

Maharashtra Political Crisis: “हा भाजपाचा डाव,” उद्धव ठाकरेंचा आरोप; शिवसैनिकांशी संवाद साधताना भावूक

हा भाजपाचा डाव, उद्धव ठाकरेंचा आरोप

Uddhav Thackeray Shivsena Eknath Shinde
प्रातिनिधीक फोटो

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपली भूमिका मांडल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. शिवसेना भवनात पक्षाच्या जिल्हाप्रमुखांची बैठक सुरु असून यावेळी उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांशी संवाद साधला. हा भाजपाचा डाव असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे. भाजपासोबत जाण्यासाठी दबाव असल्याचा दावा यावेळी उद्धव ठाकरेंनी केलं असल्याचं वृत्त एबीपी माझाने दिलं आहे.

“करोनाचं संकट गेल्या दोन वर्षांपासून मागे लागलं आहे. करोनाचा त्रास संपत असतानाच मानेचा त्रास सुरु झाला आहे. कोणती व्यक्ती कोणत्या वेळी आपल्याशी कशी वागली हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे,” असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

एकनाथ शिंदे बंडावर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “प्राईस टॅग लावल्यासारखे…”

“मी त्या दिवशी मनातलं सगळं सांगितलं, आजही मन मोकळं करणार आहे. मी वर्षा सोडली म्हणजे मोह सोडला, जिद्द सोडलेली नाही. स्वप्नातही या पदावर जाईन असा विचार केला नव्हता. त्या पदाचा मला कधीच मोह नव्हता,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “मानेची शस्त्रक्रिया केली तेव्हा मोदींनीही मला फार हिंमतीचं काम केलं असं सांगितलं होतं. त्यावेळी मी हिंमत माझ्या रक्तात आहे सांगितलं होतं,” अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.

Maharashtra Political Crisis Live : “मेलो तरी शिवसेना सोडणार नाही म्हणणारे पळून गेले”; उद्धव ठाकरेंचा बंडखोरांना टोला; वाचा प्रत्येक अपडेट…

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “पहिलं ऑपरेशन झाल्यानंतर काही दिवस ठीक होतं. पण एक दिवस उठल्यानंतर शरिरातील काही भागांच्या हालचाली होत नसल्याचं लक्षात आलं. त्यानंतर दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याचा फायदा घेत विरोधकांनी डाव साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आदित्य ठाकरे परदेशात होते”.

संजय राऊतांनी आघाडीतून बाहेर पडण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

उद्धव ठाकरेंनी यावेळी एकनाथ शिंदेंसोबत आमदार गुजरातला गेल्याची माहिती मिळाल्यानंतर काही आमदारांना निवासस्थानी बोलावलं होतं अशी माहिती दिली. यावेळी त्यांनी काही झालं तरी सोडून जाणार नाही सांगितलं होतं. पण त्यावेळी उपस्थित असणारे दादा भूसे, संजय राठोड शब्द देऊनही निघून गेले. अशा लोकांचं करायचं काय? अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी करत वाईट वाटत असल्याचंही नमूद केलं.

“काही आमदार तिकीट कापलं तरी जाणार नाही असं म्हणाले होते. पण आता गेले आहेत तर जाऊ द्या. निधी मिळाला नाही म्हणून अनेकांनी तक्रारी केल्या. मी तर सर्व पातळीवर निधी वाटपाचं काम करत आलो आहे. शिवसेनेत बंड झाल्यानंतर दोन वेळा शिवसेना सत्तेत आली आणि दोन्ही वेळा मी त्यांना महत्वाची पदं दिली,” असा उल्लेख उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचा उल्लेख न करता केला.

“तुम्हाला हवे आहेत तितके आमदार घेऊन जा. पण जोपर्यंत बाळासाहेबांनी रुजववेली मूळं आहेत तोवर शिवसेना संपणार नाही. जे सोडून गेलेत ते माझे कधीच नव्हते. मूळ शिवसेना माझ्यासोबत आहे. ज्यांना आपण मोठं केलं त्यांची स्वप्नं मोठी झाली, ती मी पूर्ण करु शकत नाही. त्यांनी जावं, बाळासाहेबांनी आम्हाला हे शिकवलेलं नाही,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, “भाजपासोबत जावं यासाठी माझ्यावर काही आमदारांचा दबाव आहे. माझ्या कुटुंबावर, मातोश्रीवर घाणेरडे आरोप करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही. मी शांत आहे षंड नाही”.

“आपण प्रत्येक वेळी त्यांना महत्वाची खातं दिली. नगरविकास नेहमी मुख्यमंत्र्यांकडे असतं, पण त्यांना दिलं. संजय राठोड यांचं वनखातं माझ्याकडे घेतलं. साधी खाती मी माझ्याकडे ठेवली. मला आता या सगळ्या आरोपांचा वीट आला आहे. ही वीट ठेवून चालणार नाही, तर अशा लोकांच्या डोक्यावर हाणणार आहे. स्वत:चा मुलगा खासदार आणि माझ्या मुलाने काही करायचं नाही का?,” अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे.

“आपल्या माथी अनेकदा पराभव झाला, पण त्याने फरक पडत नाही. जिंकणं, पराभव मनावर अवलंबून असतं. हारल्यानंतर जिंकण्यासाठी जनता साथ देत असते. बुडते ती निष्ठा आणि तरंगते ती विष्ठा. सेनेत माझ्यासोबत जी बुडेल ती निष्ठावंत सेना आहे,” असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

“जो कोणी समोर येईल त्याच्यावर मी विश्वास ठेवेन. शिवसेनेचा पहिला नारळ फुटला होता तशीच परिस्थिती आहे समजा,” असं आवाहन उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना केलं आहे. “तुम्हाला तिथे भवितव्य दिसत असेल तर खुशाल जावा, मी थांबवणार नाही. तुम्हाला वाटत असेल तर सांगा मी हे पद आनंदाने सोडण्यास तयार आहे,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

“शिवसेना चालवण्यासाठी नालायक आहे असं वाटत असेल तर मागचा फोटो काढून टाका आणि मी बाळासाहेबांचा मुलगा आहे असं विसरुन जा. शिवसेना पुढे नेण्यासाठी तुम्ही समर्थ आहात. बाळासाहेबांसाठी माझ्यापेक्षा शिवसेना लाडकं अपत्य आहे,” असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra political crisis maharashtra cm uddhav thackeray shivsena eknath shinde district head meeting sgy