अंधेरीतील प्रादेशिक परिवहन विभागाचा भूखंड विकसित करण्याच्या मोबदल्यात नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन व इतर अशी १०० कोटींची बांधकामे करून देण्याच्या प्रकल्पात राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज व पुतणे समीर संचालक असलेल्या कंपन्यांमार्फत सुमारे १३ कोटींची लाच देण्यात आल्याचा दावा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहायक आयुक्त व तपास अधिकारी नरेंद्र तळेगावकर यांनी या प्रकरणी दाखल केलेल्या फिर्यादीत केला आहे. या प्रकल्पाचे मूळ विकासक मे. चमणकर इंटरप्राइजेस यांच्या प्राइम डेव्हलपर्सशी संबंधित इतर उपकंपन्यांनी लाच दिल्याचाही दावा करण्यात आला असला तरी या भागीदार कंपन्यांवर मात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असे या फिर्यादीवरून स्पष्ट होते.
या संदर्भातील फिर्यादीत म्हटले आहे की, अंधेरी पश्चिमेकडील प्रादेशिक परिवहन विभागाचा भूखंड तसेच शासनाच्या मालकीचे भूखंड एकत्र करून ते विकसित करण्याचे कंत्राट मे. चमणकर इंटरप्राइझेसला देण्यात आल्यानंतर त्यांच्यासोबत प्राइम डेव्हलपर्स तसेच एल अँड टी एशियन रिएलिटी या कंपन्यामध्ये त्रिपक्षीय करारनामा झाला होता.
त्यानुसार सुमारे दोन हजार झोपुवासीयांचे पुनर्वसन प्राइम डेव्हलपर्सने, तर विक्री करावयाच्या इमारतीचे बांधकाम एलअँडटीने करावयाचे, असे ठरविण्यात आले होते. सध्या हा प्रकल्प ठप्प आहे. मे. चमणकर इंटरप्राइझेसने थेट लाच दिली नसली तरी त्यांच्या भागीदार कंपन्यांशी संबंधित उपकंपन्यांनी लाच दिल्याचा दावाही या फिर्यादीत करण्यात आला आहे. या ३५ पानी फिर्यादीची प्रत ‘लोकसत्ता’कडे आहे.
नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर फर्निचरच्या कामासाठी ओरिजिन इन्फ्रास्ट्रक्चरने सहा कोटींचे अंदाजपत्रक मे. चमणकर इंटरप्राइझेसला दिले होते.
ओरिजिन इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीत छगन भुजबळ संबंधित असलेल्या मुंबई एज्युकेशन ट्रस्ट या न्यासाचे लेखापाल असलेले संजय जोशी व इरम शेख हे संचालक आहेत. इरम शेख या संबंधित ट्रस्टच्या विश्वस्तांचे स्वीय सहायक तन्वीर शेख यांच्या पत्नी आहेत. मे. चमणकर इंटरप्राइझेसने ओरिजिन इन्फ्रास्ट्रक्चर्सला सहा कोटींचे देयक अदा केले आहे. ओरिजिन इन्फ्रास्ट्रक्चरने हे काम आयडीन फर्निचर प्रा. लि.ला
दिले.  ओरिजिनच्या खात्यातून ७४ लाख रुपये २००८ ते २०१२ या काळात आयडिनला देण्यात आले आहेत.
आयडीन फर्निचरच्या संचालिका भुजबळांच्या सुना शेफाली समीर भुजबळ आणि विशाखा पंकज भुजबळ आहेत. ओरिजिन इन्फ्रास्ट्रक्चरने ४५ लाख इतकी रक्कम समीर व पंकज भुजबळ संचालक असलेल्या मे. परवेश कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले. याशिवाय रॉयल इंटरपाइझेसने नऊ कोटी रुपये निश इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला दिले. या कंपनीला रॉयल इंटरप्राइझेस आणि राजेश मिस्त्री यांच्याकडून मिळालेल्या रकमेतून १२.९६ कोटी परवेश कन्स्ट्रक्शनला, २९ लाख रुपये भावेश बिल्डर्स प्रा. लि., तर ५० लाख रुपये आर्मस्ट्राँग एनर्जी प्रा. लि. या कंपनीला देण्यात आले आहेत.
या कंपन्या समीर व पंकज भुजबळ यांच्याशी संबंधित आहेत. रॉयल इंटरप्राइझेसचे मे. हार्मोनी इन्व्हेस्टमेंट अँड प्रॉपर्टीज यांच्याबरोबर आर्थिक व्यवहार होते. मे. हार्मोनी इन्व्हेस्टमेंट ही कंपनी मे. चमणकर यांच्यासोबत भागीदार असलेल्या प्राइम डेव्हलपर्सचे संचालक धनपत सेठ आणि शैलेश मेहता यांची आहे, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra sadan scam 13 crore bribe
First published on: 13-06-2015 at 05:31 IST