महाराष्ट्रात २१ हजार तर देशभरात केवळ ५९ हजार रक्तदान शिबिरे
महाराष्ट्राने एच्छिक रक्तदानात क्रांती केली असली तरी देशातील बहुतेक राज्यांमध्ये आजही बदली पद्धतीनेच रक्तदान होत असून देशाच्या राजधानीत दिल्लीमध्येही ऐच्छिक रक्तदानाचे प्रमाण अवघे तीस टक्के असल्याची धक्कदायक माहिती उघडकीस आली आहे. संपूर्ण देशात गेल्या वर्षी सुमारे ५९ हजार रक्तदान शिबिरे झाली असून यातील एकटय़ा महाराष्ट्रात २१ हजार रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. राजधानी दिल्लीसह सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये अवघी पंधराशे शिबिरे घेण्यात आली.
संपूर्ण देशातील ऐच्छिक रक्तदानाचे हे भयावह चित्र बदलण्यासाठी ‘राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदे’ने २०२०पर्यंत देशभरात १०० टक्के ऐच्छिक रक्तदान हे उद्दिष्ट निश्चित केले असून त्यासाठी सर्व राज्यांमधील ‘राज्य रक्त संक्रमण परिषदां’ची तसेच या क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते, संस्था व प्रमुख अधिकाऱ्यांची राष्ट्रीय बैठक आयोजित केली आहे.
विशेष म्हणजे १९९६ साली ‘राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदे’ची स्थापना झाल्यापासून गेल्या वीस वर्षांमध्ये देशव्यापी ऐच्छिक रक्तदानासाठी एकदाही राष्ट्रीय पातळीवर सर्व राज्यांमधील रक्त सक्रमण परिषदांची बैठक आयोजित करण्यात आली नाही. यंदा प्रथमच देशातील एच्छिक रक्तदानाच्या गंभीर परिस्थितीचा आढावा घेण्यात येऊ न येत्या २९ जानेवारी रोजी सर्व राज्यातील रक्तसंक्रमण परिषदेच्या प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तत्पूर्वी २८ जानेवारी रोजी शंभर टक्के ऐच्छिक रक्तदानाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी राष्ट्रीय कृती आराखडा तयार करण्यासाठी रक्तदान क्षेत्रातील तज्ज्ञांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. देशाची रक्ताची वार्षिक गरज ही सुमारे एक कोटी २० लाख रक्ताच्या पिशव्यांची असताना दिल्लीसह देशातील बहुतेक राज्यांमध्ये ऐच्छिक रक्तदानाचे तसेच शिबीरांचे प्रमाण अत्यल्प असल्याचे ‘एनबीटीसी’च्या एका ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले.
दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, उत्तरांचल आदी बहुतेक राज्यांमध्ये तीस टक्क्य़ांच्याही आसपास ऐच्छिक रक्तदान केले जात नाही. प्रामुख्याने रुग्णाला रक्त हवे असल्यास त्यांच्या नातेवाईक व मित्रांना रक्तदान करावे लागले अथवा बाहेरून रक्त विकत घ्यावे लागते. अनेकदा हे बदली रक्तदान ‘ऐच्छिक’ म्हणून दाखविण्याचा उद्योग केला जातो असेही दिल्लीतील एका ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, पंजाब, गुजरात आणि चंदिगड आदी काही राज्यांमध्येच ऐच्छिक रक्तदान चांगले होते. महाराष्ट्रात सुमारे २१ हजार शिबिरांच्या माध्यमातून पंधरा लाखांहून अधिक रक्ताच्या पिशव्या गोळा करण्यात येत असून त्यापैकी ९५ टक्के रक्तदान हे एच्छिक असल्याचे सूत्रांनी सांगितले देशात होणाऱ्या ५९ हजार शिबिरांमधून महाराष्ट्राचा २१ हजार शिबिरांचा वाटा वगळल्यास सर्व राज्यांमध्ये ३८ हजार शिबिरे झाली आहेत.