मंगेशकर कुटुंबीयांनी आश्वासन देऊनही आर्थिक सहाय्य न केल्यामुळे इंदूर येथील मराठी समाज या संस्थेच्या ‘माई मंगेशकर सभागृहा’वर जप्तीची नामुष्की ओढवली आहे. श्री छत्रपती शिवाजी सहकारी संस्थेकडून घेतलेल्या ३४ लाख रुपयांच्या कर्जावर आता १४ टक्के व्याजासह सुमारे ८५ लाख रुपयांची रक्कम भरायची आहे. २२ फेब्रुवारीपर्यंत ही रक्कम भरली नाही तर सभागृह जप्त करून ते लिलावात काढण्याची कारवाई केली जाणार आहे. इंदूरच्या सहकारी संस्थांच्या उपनिबंधकांनी हा निकाल दिला आहे. संबंधित सहकारी संस्थेने मराठी समाज संस्थेचे अध्यक्ष पी. डी. मुळ्ये व सचिव चंद्रकांत पराडकर यांच्याविरोधात दावा दाखल केला होता.
यासंदर्भात चंद्रकांत पराडकर यांनी सांगितले की, मराठी समाज ही सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारी संस्था असल्याने कर्जाच्या रकमेत सवलत मिळण्याची विनंती करण्यात आली होती. सभागृहाच्या उभारणीसाठी कार्यक्रम करण्याचे लेखी आश्वासन दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानच्या लेटरहेडवर संस्थेला देण्यात आले होते. मात्र, आजतागायत मंगेशकर कुटुंबीयांकडून कोणताही कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आलेला नाही. हृदयनाथ मंगेशकर यांच्या संमतीने संस्थेने कर्ज घेतले होते. कर्जाचे हप्ते आम्ही देऊ, असे आश्वासन त्या वेळी हृदयनाथ यांनी दिले होते, परंतु त्याचीही पूर्तता करण्यात आली नसल्याचे पराडकर म्हणाले.
आर्थिक मदत उभारण्याचे प्रयत्न सुरू
मंगेशकर कुटुंबीयांकडून आर्थिक मदत मिळू न शकल्याने आता मराठी समाज संस्थेने इंदूरमधील नागरिकांना आवाहन करून आर्थिक मदत उभी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. २२ तारखेपर्यंत ही रक्कम उभी करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने इंदूरमधील मराठी भाषक व अन्य भाषक मंडळींना आर्थिक मदतीचे आवाहनही संस्थेतर्फे करण्यात आले आहे. त्याला प्रतिसाद म्हणून पी. डी. मुळ्ये, बळवंत वाखले, जयश्री पराडकर यांनी एक लाख रुपयांची मदत केली. दत्तात्रय घोडगावकर हेही एक लाख रुपये देणार आहेत. शरयु वाघमारे, अरविंद अग्निहोत्री, संजू गवते यांनी ५१ हजार रुपयांची मदत केली आहे. संस्थेच्या संचालक मंडळाचे अन्य सदस्यही आर्थिक मदत करणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंगेशकर प्रतिष्ठान, लता मंगेशकर मेडिकल फाऊंडेशन यासह आम्ही नऊ सार्वजनिक विश्वस्त निधी न्यास चालवतो. या न्यासावर मंगेशकर कुटुंबीयांखेरीज विविध क्षेत्रातली अन्य काही मंडळी विश्वस्त म्हणून काम करतात. त्यामुळे कुणालाही आर्थिक मदत करताना आम्हाला या विश्वस्तांची मतेही विचारात घ्यावी लागतात. इंदूरमधील त्या संबंधित संस्थेने जे शक्य नाही ते आमच्याकडे मागितले होते. त्यामुळे त्यांची मागणी पूर्ण करणे शक्य झाले नाही.
– पंडित हृदयनाथ मंगेशकर

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mai mangeshkar auditorium indore faces seizure
First published on: 05-02-2015 at 02:58 IST