मुंबई हे वेगाचे शहर आहे. या वेगात महत्त्वाचा वाट पार पाडतात तो प्रवासाची साधने, लोकल ट्रेन असोत बेस्ट बसेस किंवा विमाने. या तिन्हीपैकी कशावरही परिणाम झाला तर मुंबईकरांना त्रास होतोच. विमान सेवा वापरणाऱ्यांना १७ फेब्रुवारी पर्यंत त्रास होणार आहे कारण मुख्य धावपट्टीच्या दुरुस्तीसाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरची मुख्य धावपट्टी दररोज सात तास बंद असणार आहे. या धावपट्टीच्या दुरुस्तीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दुसऱ्या धावपट्टीवरून विमानाचे टेक ऑफ आणि लँडिंग होऊ शकणार आहे. १७ फेब्रुवारीपर्यंत विमानतळाची मुख्य धावपट्टी सात तास बंद राहणार असल्याने त्याचा परिणाम निश्चितच विमानसेवेवर होणार आहे.

दररोज सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत मुख्य धावपट्टी बंद राहणार आहे. मुंबई विमानतळावर साधारण मिनिटाला एक विमान या प्रमाणे विमानांचे टेक ऑफ आणि लँडिंग होत असते. त्यामुळे दुसऱ्या धावपट्टीवर परिणाम होणार हे निश्चित मानले जाते आहे. मुख्य धावपट्टी दुरुस्त व्हायला १७ फेब्रुवारीपर्यंतचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे विमानांचे टेक ऑफ आणि लँडिंग अर्धा तास विलंबाने होऊ शकते असेही समजते आहे. धावपट्टीच्या दुरुस्तीच्या कामामुळे होणारा परिणाम आणि लागणारा वेळ लक्षात घेऊन विमान सेवेचा वापर करणाऱ्या प्रवाशांनी नवे वेळापत्रक लक्षात घ्यावे असे आवाहन जेट एअरवेजने केले आहे.