मुंबई : मालेगाव येथे २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्यात गुरुवारी आणखी एका साक्षीदाराला विशेष न्यायालयाने फितूर घोषित केले. त्यामुळे खटल्यातील फितूर साक्षीदारांची संख्या २६ झाली.

तपास यंत्रणेसमोर जबाब नोंदवताना दिलेली पूर्ण माहिती या साक्षीदाराने न्यायालयासमोर देण्यास नकार दिला. त्यामुळे तपास यंत्रणेच्या विनंतीनंतर या साक्षीदाराला विशेष न्यायालयाने फितूर घोषित केले.

इंदूरमधील एका हॉटेलमध्ये कार्यरत या साक्षीदाराने खटल्यातील आरोपी अजय राहिरकर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितसारख्या आरोपींनी हॉटेलमध्ये दुसऱ्याच्या नावाने खोली घेतल्याचे तपास यंत्रणेसमोर जबाब नोंदवताना सांगितले होते. साक्षीदाराने स्वत: हॉटेलच्या नोंदवहीत याबाबच्या नोंदी केल्या नव्हत्या. मात्र तो सहाय्यक व्यवस्थापक असल्याने त्याला त्याबाबतची माहिती होती, असा तपास यंत्रणेचा दावा होता. परंतु गुरुवारी साक्षीसाठी पाचारण करण्यात आल्यावर या साक्षीदाराने याबाबत माहिती देण्यास नकार दिला. त्यामुळे त्याला फितूर घोषित करण्यात आले.