२००८ मालेगाव बॉम्बस्फोट ;‘एनआयए’चा उच्च न्यायालयात दावा

२००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोटाचा राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) केलेला तपास हा त्रुटींनी परिपूर्ण होता, असा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) गुरुवारी उच्च न्यायालयात केला.

या प्रकरणातील मुख्य आरोपी लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित याच्या जामीन अर्जावर सध्या न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर जोशी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. गुरूवारच्या सुनावणीत ‘एनआयए’च्या वतीने युक्तिवादाला अ‍ॅड्. संदेश पाटील यांनी युक्तिवादाला सुरूवात केली. त्या वेळी ‘एटीएस’च्या तपासाची दिशा योग्य होती, मात्र यंत्रणेने प्रकरणाचा तपास योग्यरितीने केला नाही, असा दावा पाटील यांनी केला. एटीएसने या प्रकरणाचा केलेला तपास सुसंगत नव्हता. त्यामुळेच तो तसाच्या तसा स्वीकारणे योग्य नव्हते. त्यांनी तपासात ज्या त्रुटी ठेवल्या त्याचा शोध घेऊन तपास सुसंगत करण्याचा प्रयत्न केला गेला, असा दावाही ‘एनआयए’तर्फे करण्यात आला.

‘एनआयए’च्या या दाव्यानंतर ‘एटीएस’ने ज्या साक्षीदारांचे जबाब नोंदवले, त्यांचे नव्याने जबाब नोंदवण्याची गरज काय, असा सवाल न्यायालयाने केला. त्यावर ‘एनआयए’ने ५०४ साक्षीदारांचे नव्याने जबाब नोंदवले आहेत आणि त्यातील १४९ साक्षीदार नवे होते, असा दावा पाटील यांनी केला.