अशोक चव्हाण यांचा भाजपवर आरोप

मराठा समाजाचे आंदोलन चिघळवून मराठा विरुद्ध इतर समाज असा संघर्ष निर्माण करण्याचा आणि आगामी निवडणुकीत त्याचा राजकीय लाभ उठवायचा, असा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. मात्र राजकीय फायद्यासाठी सामाजिक सलोख्याचे वातावरण बिघडविण्याचा भाजपचा डाव, काँग्रेस पक्ष यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा आंदोलनाने धारण केलेले उग्र रूप आणि राज्य सरकारने घेतलेली बघ्याची भूमिका या पाश्र्वभूमीवर चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका मांडली. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात राज्य सरकारची नेमकी काय भूमिका आहे ते जनतेला समजले पाहिजे, त्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन तातडीने बोलवावे, अशी मागणी त्यांनी केली.  महाराष्ट्रातील सामाजिक एकतेचे व बंधुभावाचे वातावरण बिघडवून टाकायचे, जाती-जातीत संघर्ष पेटवून मराठा समाजाला एकटे पाडायचे आणि इतर समाजांना त्यांच्याविरोधात लढवून मतांचे ध्रुवीकरण करायचे, हा सरकारचा कटच आहे असा आरोप त्यांनी केला.

मराठा समाजाने दलित, ओबीसींना बरोबर घेऊन व्यवस्था बदलासाठी लढावे !

मराठा आरक्षणाचे समर्थन करतानाच, मराठा समाजाने दलित, आदिवासी, ओबीसी समाजाला बरोबर घेऊन व्यवस्था परिवर्तनाची लढाई लढण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन समाजातील मान्यवरांनी केले आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत ही लढाई सनदशीर व शांततेच्या मार्गानेच लढली पाहिजे, असे संयुक्तरीत्या प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या संदर्भात शेकापचे ज्येष्ठ प्रा. एन. डी. पाटील, निवृत्त न्यायमूर्ती  बी. एन. देशमुख, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार,  ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, कष्टकरी चळवळीचे नेते डॉ. भारत पाटणकर, बीव्हीजी समूहाचे अध्यक्ष हनुमंत गायकवाड, कवी डॉ. विठ्ठल वाघ, ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, डॉ. सुधीर गव्हाणे,  श्रीमंत कोकाटे, नाटककार जयंत पवार, संतोष पवार, ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे, प्रकल्पग्रस्तांचे नेते संपत देसाई सामाजिक कार्यकर्त्यां मेघा पानसरे, पत्रकार प्रताप आसबे, ज्ञानेश महाराव, विजय चोरमारे, आदींनी मराठा आंदोलकांना शांततेचे आवाहन केले आहे.   आरक्षणाची मागणी व्यवहार्य असली तरी त्यासाठी कुणी हिंसक लढय़ासाठी भरीस घालत असेल तर सावध राहायला हवे. अ‍ॅट्रॉसिटीचा मुद्दा काढून मराठा-दलितांमध्ये, तसेच आरक्षणाच्या निमित्ताने मराठा-ओबीसींमध्ये तेढ वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यापासून सावध राहिले पाहिजे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.  आर्थिक विपन्नावस्थेत ढकलल्या गेलेल्या मराठा समाजाला बाहेर काढण्यासाठी सरकारने मदतीचा हात दिलाच पाहिजे. त्यासाठी आरक्षणाची लढाई लढली पाहिजे, असे कुणाला वाटत असेल तर त्यात चुकीचे नाही. आपण छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून घेतो, तर आपल्या हक्काची लढाई आपल्यालाच लढायची आहे, आणि ती अखेरच्या टप्प्यापर्यंत न्यायची आहे, असा निर्धार हवा. जलसमाधी, आत्मदहन यांसारखे मार्ग अवलंबून  ही लढाई अखेपर्यंत नेता येणार नाही.