मराठी साहित्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे तसेच वाचनसंस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी   महाराष्ट्रात ‘पुस्तकांचे गाव’ तयार करण्याचा आपला विचार असून हे गाव कायमस्वरुपी असेल, अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी मुंबईत केली.  
मराठी भाषा विभाग आणि राज्य साहित्य व संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या हस्ते विंदा जीवनगौरव पुरस्कार तर ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ यांच्या हस्ते ढवळे प्रकाशनास श्री. पु. भागवत पुरस्कार प्रदान करण्यात आला. ढवळे प्रकाशनाच्या वतीने अंजनेय ढवळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप अनुक्रमे ५ लाख व ३ लाख रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे आहे. त्या वेळी तावडे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या ‘पुस्तकांच्या गावात’ मराठी लेखकांची हजारो पुस्तके ठेवण्यात येणार असून या गावाला भेट देण्यासाठी फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर अन्य राज्यांतूनही साहित्यप्रेमी आणि वाचकांनी यावे, असा आपला प्रयत्न राहील असे तावडे म्हणाले.    
मनोगत व्यक्त करताना प्रा. मिरासदार म्हणाले, विंदांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार म्हणजे मराठी साहित्यातील विनोदी लेखनाचा सन्मान आहे.
‘मराठी भाषा दिन’ साजरा होत असताना मराठीतील ज्येष्ठ कवी विंदांच्या नावाचा हा पुरस्कार स्वीकारताना विशेष आनंद आणि धन्यता वाटत आहे. विंदांचे माझ्यावर खूप मोठे उपकार असल्याचे सांगून मिरासदार म्हणाले, मराठी साहित्यात विनोदी प्रकारच्या लेखनात मी अधिक रमलो. त्यामुळे माझ्याकडून या प्रकारचे लेखन अधिक प्रमाणात झाले.