मराठी रंगभूमीवर एका वेगळ्याच फॉर्ममध्ये सादर झालेले आणि लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने लोकप्रिय केलेले ‘जांभुळ आख्यान’ पुन्हा एकदा रंगभूमीवर येणार आहे. लोकशाहिरांचा पुत्र नंदेश उमप हाच या नाटकाची निर्मिती करत असून लोकशाहिरांनी साकारलेली भूमिकाही तो स्वत:च साकारणार आहे.  
विठ्ठल उमप यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनाच्या दिवशी, २६ नोव्हेंबर रोजी, या नाटकाचा प्रयोग रवींद्र नाटय़मंदिराच्या मिनी थिएटरमध्ये होणार आहे, अशी माहिती नंदेश उमप याने ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
नागपूर येथे एका कार्यक्रमाचे सादरीकरण करताना रंगमंचावरच दोन वर्षांपूर्वी बाबांचा मृत्यू झाला. ही घटना आम्हाला खूपच लागली. ‘जांभुळ आख्याना’वर बाबांचा खूप जीव होता. हे नाटक आपण पुन्हा रंगभूमीवर आणावे, असा विचार खूप दिवस चालू होता. आता त्यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनी हे नाटक पुन्हा सादर होणार आहे, ही आमच्यासाठी समाधानाची गोष्ट आहे, असे नंदेश म्हणाला. हे नाटक आम्ही ‘लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर्स’ या संस्थेकडून रंगमंचावर आणत आहोत आणि नाटकाचा निर्माता म्हणून आपण समोर येत आहोत, असेही त्याने स्पष्ट केले.
‘जांभुळ आख्यान’ने महाराष्ट्रातील नाही, तर देशभरातील मराठी माणसांच्या मनात घर केले आहे. आम्ही हे नाटक सादर करताना त्यात थोडेसे बदल केले आहेत. अजित भगत यांनी दिग्दर्शकीय दृष्टीकोनात काही बदल केले असून अच्युत ठाकूर यांनी संगीतातही बदल केले आहेत. असे असले, तरी बाबांसह काम करणारे बहुतांश सगळे कलाकार या नाटकात आहेत. तसेच बाबांनी केलेली भूमिका आपण सादर करत आहोत, असे नंदेशने सांगितले.  बाबांची भूमिका आपण साकारणार असल्याने थोडे दडपण होते. मात्र त्यांच्याच आशीर्वादाने आपल्याला स्फूर्ती मिळाल्याचे नंदेशने स्पष्ट केले.