लोकप्रियतेच्या बाबतीत गगनावेरी गेलेला ‘उंच माझा झोका’ जमिनीवर उतरण्याची शक्यता आहे. या मालिकेच्या चित्रिकरणाला चित्रनगरीत शासनाने दिलेली सवलत संपून पंधरवडा उलटून गेल्यानंतर आता चित्रनगरी प्रशासनाने मालिकेचे निर्माते वीरेंद्र प्रधान यांना संपूर्ण पैसे भरण्याची नोटीस पाठवली आहे.
दिलेल्या मुदतीत पैसे न भरल्यास ‘योग्य ती’ कारवाई करण्याचा इशाराही प्रधान यांना देण्यात आला आहे.
चित्रनगरीत मराठी मालिकांच्या चित्रिकरणासाठी एका वर्षांपेक्षा जास्त सवलत देणे शासनाला शक्य होणार नसल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांनी सांगितले होते. मात्र, ही सवलत कायमस्वरूपी करण्यात यावी, अशी विनंती करणारा अर्ज प्रधान यांनी सांस्कृतिक मंत्रालयाकडे दिला होता. भाजप नेते विनोद तावडे यांनीही या प्रश्नात लक्ष घातले होते.
मात्र सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या भूमिकेत बदल करणारा एकही निर्णय सरकारकडून न आल्याने अखेर बुधवारी प्रधान यांना चित्रनगरी प्रशासनाने नोटीस पाठवली आहे. आतापर्यंत असलेले भाडे आणि थकबाकी त्वरीत जमा करा, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.

विनोद तावडे गेले कुठे?
मराठी मालिकांना कायमस्वरूपी सवलत मिळावी यासाठी आपण स्वत: मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असल्याचे, विनोद तावडे यांनी सांगितले होते. मात्र त्यानंतर तावडे यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळालेला नाही. दूरचित्रवाणीवर मोठय़ा धडाक्यात विधान करून तावडे गायबच झाले. मग विनोद तावडे गेले कुठे?
– वीरेंद्र प्रधान