फुलांचे भाव गडगडले ! झेंडू ३० रुपये, तर शेवंती ४० रुपये प्रतिकिलो

नवरात्रोत्सव आणि दसऱ्याला फुलांच्या मागणीत वाढ झाली आणि फुलांना चांगला भाव मिळाला.

मुंबई : मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर फुलांचे भाव गडगडले. गेल्या दिवाळीला १०० ते १२० रुपये प्रतिकिलो दराने झेंडूची विक्री झाली होती. मात्र बुधवारी दर गडगडल्याने झेंडू ३० रुपये प्रतिकिलो विकला जात होता. राज्यभरात फुलांचे मुबलक पीक आल्याने आवक वाढली असून झेंडूसह सर्वच फुलांचे दर कोसळल्याने ऐन दिवाळीत व्यापाऱ्यांना काळजीने ग्रासले आहेत.

नवरात्रोत्सव आणि दसऱ्याला फुलांच्या मागणीत वाढ झाली आणि फुलांना चांगला भाव मिळाला. त्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा नफा मिळाला. दिवाळीतही फुलांना चांगला भाव मिळेल या उद्देशाने लक्ष्मीपूजनाच्या एक दिवस आधी झेंडूसह विविध फुलांची मोठय़ा प्रमाणावर मुंबईत आवक झाली. परिणामी झेंडू, शेवंती आदी महत्त्वाच्या फुलांचे भाव गडगडले. गेल्या वर्षी दिवाळीत झेंडू १०० रुपये प्रतिकिलोने विकला गेला होता. यंदा घाऊक बाजारात चांगल्या प्रतीचा झेंडू ४० ते ५०, तर लहान आकाराचा झेंडू ३० रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. एरव्ही शंभरी पार असणारी शेवंती बुधवारी ४० रुपये प्रतिकिलोने उपलब्ध होती.

‘फुलांना दर कमी मिळाल्याने व्यापाऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागणार आहे. पण शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. पीक जास्त आल्याने नफ्याचे गणित बिघडून गेले,’ असे मीनाताई ठाकरे फूल मंडईतील व्यापारी संजय जाधव यांनी सांगितले.

पोलिसांचे वाहतूक नियोजन

लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला दादरमध्ये गर्दी होणार याचा अंदाज घेऊन पोलिसांनी दादरकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर कडक बंदोबस्त ठेवला होता. वाहनांमुळे गर्दी होत असल्याने सर्व प्रमुख गल्ल्या रस्तारोधक (बॅरिकेड) उभारून बंद करण्यात आल्या होत्या. केवळ पायी जाणाऱ्या ग्राहकांना बाजारपेठेत प्रवेश मिळत होता. ठिकठिकाणी वाहतूक पोलीस वाहनचालकांना मार्गदर्शन करत होते.

किरकोळ बाजारात गर्दी

दादर स्थानकाबाहेरील किरकोळ फूलबाजारात नागरिकांनी मोठी गर्दी केली. फुले, हार, तोरण, गजरे, आंब्याचे डहाळ खरेदीसाठी झुंबड उडाली होती. किरकोळ बाजारात झेंडू ८० ते १०० रुपये प्रतिकिलोने विकला जाता होता. मुंबई बाहेरून येणाऱ्या महिलांनी दादरच्या गल्ल्या व्यापून टाकल्या होत्या. फुले, तांदळाच्या लोंब्या, तोरण याने रस्ते सजले होते तर कार्यालयातून घरी परतणारे खरेदीत दंग झाले.

फूलबाजारात मंगळवारी रात्रीपासून अंदाजे २५ हून अधिक ट्रक झेंडूसह दाखल झाले. त्याशिवाय १०० हून अधिक छोटय़ा टेम्पोतून फुले घेऊन शेतकरी आले. मात्र दसऱ्याइतकी मागणी दिवाळीला कधीही नसते. त्यामुळे उठाव कमी आणि फुले जास्त अशी स्थिती निर्माण झाली. याचा फटका बाजारपेठेला बसला आहे.

राजेंद्र हिंगणे, व्यापारी

वादळी चर्चेची शक्यता

३० शौचालयांच्या दुरुस्तीचा खर्च हा बांधकामांच्या खर्चापेक्षा ४५ टक्क्यांनी जास्त असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. दुरुस्ती केल्यामुळे शौचालयांचे आयुर्मान ३ ते ५ वर्षांपर्यंत वाढू शकते. त्याऐवजी शौचालयांची पुनर्बाधणी करणे व्यवहार्य असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे झोपडपट्टी परिसरातील धोकादायक ठरलेली ३० शौचालये पाडून त्या ठिकाणी २० कोटी रुपये खर्च करून एक आणि दुमजली शौचालये बांधण्यात येणार आहेत. कंत्राटदाराने त्या शौचालयांच्या पुनर्बाधणीबरोबरच मलकुंडांच्या सफाईचे कामही करणे अपेक्षित आहे. मात्र एका शौचालयाच्या बांधकामासाठी सरासरी ६८ लाख रुपये खर्च येत असल्यामुळे स्थायी समितीच्या पुढच्या बैठकीत यावरून वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Marigold flower prices fell on the eve of diwali zws