|| नीलेश अडसूळ/ पूनम सकपाळ

चिनी कंदिलांऐवजी बांबू, पुठ्ठे, कापडी कंदिलांकडे कल

मुंबई/नवी मुंबई : करोना प्रादुर्भावापासून चिनी मालावर आलेले निर्बंध आणि चिनी वस्तूंबाबत एकंदर जनतेत निर्माण झालेला रोष यांचा परिणाम दिवाळीतील आकाशकंदिलांच्या बाजारात स्पष्ट दिसून येत आहे. यंदा महानगरांतील बाजारांत भारतीय बनावटीचे बांबू, कागद, कार्डबोर्ड, फायबर जाळी, कापड यांच्या वापरातून बनवलेले पारंपरिक कंदील मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. बाजारातील चिनी कंदिलांचे प्रमाण पाच टक्क्यांहून कमी असून तोही गेल्या वर्षी शिल्लक राहिलेला माल असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

दारावरील, गॅलरीत प्रकाशमान होणाऱ्या आकाशकंदिलांमुळे दिवाळीचा झगमगाट अधिक वाढतो. पूर्वी दिवाळीच्या तोंडावर घरोघरी बांबूच्या काड्या किंवा कागद यांच्या मदतीने कंदील घडवले जात. मात्र, ही परंपरा मागे पडली असून त्या कंदिलांची जागा बाजारातून खरेदी करून आणलेल्या कंदिलांनी घेतली आहे. यातही प्लास्टिकपासून बनवलेले विविधरंगी, आकारांतील चिनी बनावटीच्या कंदिलांना अधिक पसंती मिळते. गतवर्षी करोनाचे सावट असले तरी, आकाशकंदिलांची मागणी फारशी घटली नव्हती. परंतु, त्या काळात चिनी मालाविरोधात झालेल्या प्रसाराचे परिणाम यंदाच्या दिवाळीत प्रकर्षाने दिसत आहेत.

 यंदा बाजारात स्थानिक कारागिरांनी बनवलेल्या कंदिलांची अधिक रेलचेल दिसून येत आहे. त्यात बांबू, पुठ्ठे, रंगीत कागद, कापड यांच्या मदतीने बनवलेल्या पर्यावरणस्नेही कंदिलांचे प्रमाण जास्त आहे. यंदा कोल्हापूरहून आवक झालेले आकाशकंदील ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. फायबर जाळीवर कापडी पट्ट्या (लेस), विविधरंगी टिकल्या यांच्या साह्याने नक्षीकाम करून घडवलेले हे कंदील साडेपाचशे रुपयांपासून बाराशे रुपयांपर्यंत किमतीला उपलब्ध आहेत. कापडावर विणकाम करून त्याला पुठ्ठ्याच्या साह्याने आकार देऊन घडवलेले आकर्षक कंदील अडीचशे ते ६५० रुपयांना उपलब्ध आहेत. पारंपरिक लाकडी फ्रेमपासून बनवलेले कंदील ९०० ते ११०० रुपयांना उपलब्ध आहेत. कागदापासून बनवलेले कंदील चारशे ते सहाशे रुपयांना मिळत आहेत. प्लास्टिकच्या कंदिलांचे पर्यायही उपलब्ध आहेत. मात्र, ग्राहक पर्यावरणस्नेही कंदिलांना अधिक पसंती देत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

किमतीत अंशत: वाढ

स्वदेशी बनावटीचे हे कंदील चिनी कंदिलांच्या तुलनेत महाग आहेत. तसेच कंदिलाच्या सरासरी दरांतही ४० ते ६० रुपयांची वाढ झाली आहे, अशी माहिती वाशी एपीएमसी बाजारातील रवी कानावत या दुकानदाराने दिली. गतवर्षी कंदिलांच्या मागणीत घट झाली असली तरी गेल्या काही दिवसांत कंदील खरेदीसाठी गर्दी होऊ लागल्याचे अनिल गुलाल या विक्रेत्याने सांगितले.

विक्रमगडचे कंदील अमेरिकेत

पालघर ह्यिलातील विक्रमगड तालुक्यातील टेटावली भुरकुडपाडा गावातील महिला बचत गटाने बांबूच्या स्ह्याने घडवलेल्या आकाशकंदिलांना अमेरिकेसह अन्य देशांतील बाजारांतून मागणी येत आहे. ‘केशवसृष्टी’ या संस्थेमार्फत या महिलांना प्रशिक्षण देण्यात आले असून गेल्या दोन वर्षांपासून त्या शेतीची कामे सांभाळून दिवाळीपूर्वी कंदील घडवण्याचे काम करतात. साधारण ३०० ते ८०० रुपये किमतीला उपलब्ध असलेले हे कंदील मुंबई, ठाण्याच्या बाजारांतही उपलब्ध आहेत. यंदा यातील दोनशे कंदील अमेरिकेतही पाठवण्यात आल्याचे गावाचे उपसरपंच पांडुरंग भुरकुड यांनी सांगितले.

कंदिलांवरही ‘जरतारीचा मोर नाचरा’

मुंबईतील संदेश गावकर या तरुणाने इरकली साडीचा वापर करून कंदील घडवले आहेत. या वर्षी दीड हजारहून अधिक कंदील घडवल्याचे संदेश सांगतो. ‘समाजमाध्यमांच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचत आहोत. घरगुतीच नाही तर कॉर्पोरेट कंपन्यांकडूनही मागणी येत आहे. कला आणि परंपरा यांचा मेळ साधून व्यवसाय करताना समाधान मिळते,’ असे तो म्हणाला. अभिषेक साटम यांनीही पैठणीचा वापर करून आकर्षक नक्षीकाम केलेले कंदील घडवले आहेत. गेल्या पाच वर्षांपासून हे कंदील घडवत असून यंदा त्यांना विशेष मागणी असल्याचे ते म्हणाले. उत्सवी लहाने यांनी ‘गोधडी’ कंदील ही संकल्पना साकारली असून गोधडीप्रमाणे कापड शिवून त्याद्वारे कंदील घडवण्यात आले आहेत. समाजमाध्यमांवरून या कंदिलांची विक्री होत असून परदेशातूनही त्याला चांगली मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.