पर्यटकांसाठी आकर्षण ठरणारी आणि स्थानिकांना सोयीची असणारी माथेरान मिनी ट्रेन लवकरच सहा डब्यांऐवजी आठ डब्यांची धावणार आहे. गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेली मिनी ट्रेन ऑक्टोबरपासून अमन लॉज ते माथेरानपर्यंत चालविण्यात आली, परंतु ट्रेन सुरू होताच प्रवाशांचा आणि स्थानिकांचा मिळणारा प्रतिसाद यामुळे सहा डबेही कमी पडत आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेकडून आठ डब्यांची ट्रेन चालवण्यात येणार असून त्यासाठी चाचणीचीही तयारी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मध्य रेल्वेकडून नेरळ ते माथेरान अशी संपूर्ण सेवा सुरू करण्यावर भर दिला जात आहे. हे काम त्वरित पूर्ण करून मार्च २०१८ पासून नेरळ ते माथेरान अशी सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

सध्या सहा डब्यांसह धावत असलेल्या मिनी ट्रेनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शनिवारी आणि रविवारी पर्यटकांची खूप गर्दी असते. त्यामुळे स्थानिक आणि काही पर्यटक मिनी ट्रेनच्या सेवेपासून वंचितच राहतात. त्याचे सहा डबेदेखील अपुरे पडत असून स्थानिकांकडून डबे वाढविण्याची मागणी केली जात आहे. ही मागणी लक्षात घेता मिनी ट्रेनला आणखी दोन डबे जोडून आठ डब्यांची ट्रेन चालविण्यात येणार आहे. यासंदर्भात मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सुरेंद्रकुमार जैन यांनी लवकरच आठ डब्यांच्या मिनी ट्रेनची चाचणी घेण्यात येईल, अशी माहिती दिली. मात्र या चाचणीची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही.

प्रवाशांना कोणताही त्रास न देता ही चाचणी करण्याचाही आमच्याकडून प्रयत्न असणार असल्याचे जैन यांनी सांगितले. नेरळ ते माथेरान मार्गाच्या सुरक्षा उपाययोजनांसाठी १८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातील सहा कोटी ७५ लाख रुपये अमन लॉज ते माथेरान मार्गावरील सुरक्षा योजनांसाठी खर्च करण्यात आले आहेत. तर नेरळ ते अमन लॉज मार्गाच्या कामांसाठी ११ कोटी २५ लाख रुपयांची तरतूद आहे. रुळाच्या बाजूला लोखंडी सुरक्षा तटबंदी, संरक्षक भिंत यासारख्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.