उपनगरातील मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गाना जोडणारा माटुंगा स्थानकातील लांब लचक ‘झेड-पूल’ येत्या ५ मार्चपासून ४५ दिवसांसाठी बंद राहणार आहे. स्लॅबच्या दुरुस्तींच्या कामासाठी हा पादचारी पूल बंद ठेवण्यात येत आहे. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना नियमित अंतरापेक्षा २०० मीटर लांब अंतरावरुन वळसा घेऊन प्रवास करावा लागणार आहे. परिणामी या पुलाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दीड महिना त्रास सहन करावा लागणार आहे.
माटुंगा रेल्वे स्थानकांतील सर्वात लांब पूल म्हणून झेड-पूलाची ख्याती आहे. ३०० मीटर लांबीच्या या पुलावरून रोज एक लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. माटुंगा भागात वाढत जाणाऱ्या औद्योगिक वसाहतींमुळे या पुलाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढत आहे. त्यात या भागात अनेक शाळा, महाविद्यालये, खासगी संस्थांची कार्यालये, नाटय़गृह असल्याने या पुलावरुन रोज रेल्वे प्रवाशांसह सर्वसामान्य प्रवाशांची वर्दळ असते. लांबचे अंतर अगदी दहा मिनिटांत पार होत असल्याने प्रवाशांना यापुलामुळे दिलासा मिळत असतो.
मात्र येत्या ४५ दिवसांसाठी दुरुस्तीच्या कामासाठी हा पूल बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना या पुलाच्या बरोबरीने जाणारया मार्गाने प्रवास करावा लागणार आहे. मात्र १० मििनटाच्या या अंतरासाठी प्रवाशांना आता अधिकची पायपीट करावी लागणार आहे. माटुंगा स्थानाकातील झेड-पूल हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या पूलावरून रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र या पुलाच्या स्लॅबची अवस्था खराब झाल्याने ४५ दिवसांसाठी हा पूल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुलाची स्थिती खराब झाल्याने एखादा अपघात होऊ नये, यासाठी पुलाच्या दुरुस्तीचे काम तातडीने करण्यात येत असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Matunga famous zee bridge to be shut for 45 days
First published on: 04-03-2016 at 00:05 IST