महालक्ष्मी रेसकोर्सवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीम पार्क उभारण्यात येणार असून राज्य सरकारने त्यात ढवळाढवळ करू नये. धनदांडग्यांसाठी रेसकोर्सवर हेलिपॅड उभारण्याचा घाट सरकारने घातला असून तो प्रस्ताव महापालिका फेटाळून लावेल, असे महापौर सुनील प्रभू यांनी स्पष्ट केले.
मोकळी मनोरंजन मैदाने, क्रीडांगणे, उपवने, उद्याने यांची मुंबईकरांना आवश्यकता आहे. त्यांना विरंगुळ्यासाठी एकही ठिकाण नाही. म्हणूनच रेसकोर्सवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीम पार्क उभारण्याची मागणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे करण्यात आली आहे. उलटपक्षी रेसकोर्सवर धनदांडग्यांसाठी हेलिपॅड उभारण्याचा घाट सरकार घालत आहे, असा आरोप सुनील प्रभू यांनी पालिका मुख्यालयात मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.
गोरेगाव-मुलुंड रस्त्याचे आरेखन महापालिकेने तयार केले असून त्याच्या खर्चाचा तपशीलही निश्चित करण्यात आला आहे. या रस्त्याचे काम पालिकाच करणार, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. किनारपट्टी मार्गाचा प्रस्ताव २०१२ मध्ये राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. मात्र त्यावर निर्णय झालेला नाही. या प्रकल्पामुळे कोळीवाडे आणि कोळी बांधवांच्या रोजगाराला फटका बसणार नाही याची काळजी घेण्यात येईल. या प्रकल्पासाठी मुंबईतील महायुतीचे खासदार केंद्रात पाठपुरावा करतील, असे सुनील प्रभू म्हणाले.