‘माझे कुटुंब माझी जबाबदारी योजने’त २३ लाख मधुमेह- रक्तदाब व कर्करुग्णांचा शोध!

सर्व रुग्णांना माझे कुटुंब योजनेतून उपचारासाठी योग्य मार्गदर्शन व मदत

संदीप आचार्य 
महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या कमी व्हावी तसेच लोकसहभागातून जनजागृती करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी योजने’त नवीन करोना रुग्णांबरोबरच तब्बल २३ लाख ७५ हजार मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच कर्करुग्णा आढळून आले आहेत. या सर्व रुग्णांना माझे कुटुंब योजनेतून उपचारासाठी योग्य मार्गदर्शन व मदत करण्यात आली आहे.

देशातील अन्य कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रात करोना रुग्ण व मृत्यूचे प्रमाण जास्त असून राज्यातील करोना आटोक्यात आणण्यासाठी उत्तर प्रदेशमधे करोना नियंत्रित करण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘दस्तक’ योजनेच्या धर्तीवर माझे कुटुंब माझी जबाबदारी योजना राबविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. राज्याची गरज लक्षात घेऊन तज्ज्ञांच्या मदतीने या योजनेत अनेक चांगल्या गोष्टींचा समावेश करण्यात आल्या. आरोग्य विभागाच्या आशा कार्यकर्त्या तसेच आरोग्य सेवक आदी मिळून सुमारे ५९,६७९ पथक यासाठी तयार करण्यात आली. या पथकांबरोबर गावपातळीवर लोकप्रतिनिधींचाही या योजनेत समावेश करण्यात येऊन राज्यातील घरोघरी जाऊन करोना रुग्ण शोधण्याबरोबर आरोग्य जनजागृती करण्यात आली. यातून सुमारे २३ लाख ७५ हजार ३७२ मधुमेही, उच्च रक्तदाब तसेच कर्करुग्णांसह कोमॉर्बीड रुग्णांचा शोध घेण्यात आला.

या रुग्णांना योग्य उपचारासह करोना होऊ नये यासाठी कशी काळजी घ्यायची याची माहिती देण्यात आली. यात ८,६९,३७० मधुमेही रुग्ण, उच्च रक्तदाबाचे १३,०८,२२७ रुग्ण तर ७३,०५५ ह्रदयविकाराचे आणि १७,८४३ कर्करुग्णांना शोधण्यात आले याशिवाय विविध आजारांचे १,०६,८७७ रुग्णांना शोधण्यात आरोग्य विभागाला यश आले.

एकूण दोन टप्प्यात माझे कुटुंब माझे आरोग्य योजना राबविण्यात आली असून पहिला टप्पा १५ सप्टेंबरपासून १० ऑक्टोबर तर दुसर्या टप्प्यात १२ ऑक्टोबरपासून २९ ऑक्टोबरपर्यंत ही योजना राबविण्यात आली. एकूण पाच कोटी ४० लाख घरांमधील लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात सव्वातीन लाख संशयित करोना रुग्णांची तपासणी करण्यात आल्यानंतर ५१ हजार करोना रुग्ण आढळून आले. या सर्वांवर आरोग्य विभागाच्या रुग्णालयात तातडीने उपचार करण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय जवळपास सव्वा लाख करोना रुग्णांना आरोग्य शिक्षण देण्यात आले. या सर्वांचा परिणाम ग्रामीण भागात करोनाबाबत योग्य काळजी घेतली जाऊ लागली. ताप किंवा अन्य लक्षणे आढळल्यास लोक स्वतः हून चाचणी करून घेऊ लागले. राज्यात आजच्या दिवशी जवळपास ९२ लाख ५० करोना चाचण्या करण्यात आल्या असून यात १८.४२ टक्के रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळून आले.

आज राज्यातील एकूण करोना रुग्णांपैकी ९० टक्के रुग्ण बरे झाले असून यात माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेचा मोलाचा वाटा असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकार्यांचे म्हणणे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या योजनेमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच कॅन्सर व हृदयविकाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले असून त्यांच्यावरही उपचार सुरु करणे शक्य झाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maze kutumb mazi jababdari scheme searched 23 lakh diabetes blood pressure and cancer scj