मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदासाठीचा उमेदवारी अर्ज फेटाळून लावण्याच्या निवडणूक अधिकाऱ्याच्या निर्णयाला भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी दिलेल्या आव्हानवर न्यायालयाने सोमवारी एमसीएला दोन दिवसांत आपली बाजू मांडण्याचे आदेश दिले. 
मुंबईचे कायमस्वरुपी निवासी असलेल्याच एमसीएची निवडणूक लढविता येते, असे सांगत मुंडे यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्याने फेटाळून लावला होता. त्यानंतर मुंडे यांनी एमसीएचे अध्यक्ष रवी सावंत यांच्याकडे दाद मागितली होती. परंतु, सावंत यांनी ती फेटाळली होती. मुंडे यांच्या निवडणूक ओळखपत्रावर त्यांचा निवासी पत्ता हा बीडचा असल्याचे नमूद आहे. त्यामुळे त्यांना एमसीएच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकाऱ्याने अपात्र ठरविले होते. त्याविरोधात मुंडेंनी न्यायालयात धाव घेतली. अतिरिक्त न्यायाधीश एम. एस. शर्मा यांच्यासमोर त्यावर सोमवारी सुनावणी झाली. एमसीएला सविस्तरपणे आपली बाजू मांडण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. एमसीएचे उत्तर आल्यानंतरच न्यायालय याप्रकरणी निकाल देईल.