* देशपातळीवर ३५ लाख रुग्णांच्या थुंकीमध्ये या रोगाचे जंतू सापडतात तर सुमारे पाच लाख लोकांचा दरवर्षी क्षयरोगाने मृत्यू होतो.
* एकटय़ा मुंबईत २०१२ मध्ये क्षयाचे दहा हजाराहून तर एमडीआर टीबीचे २४२९ रुग्ण आढळले आहेत.
मुंबईसह साऱ्या देशात सध्या एमडीआर टीबीचे (बहुऔषधी उपचार प्रणालीला दाद न देणारा क्षयरोग- मल्टी ड्रग रेझिस्टंट) रुग्ण वाढत असून या रुग्णांचे निदान तात्काळ व्हावे यासाठी मुंबई महापालिकेने अत्यंत अद्ययावत असलेले ‘जेनएक्स’ मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे होणाऱ्या तपासणीतून अवघ्या दोन तासात एमडीआर टीबीचे निदान होत असल्यामुळे पहिल्या टप्प्यात पालिकेने सहा मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र टीबीचे वाढते प्रमाण लक्षात घेता पालिकेच्या रुग्णालयांमध्ये किमान २४ मशीनची आवश्यकता असल्याचे पालिका रुग्णालयांतील ज्येष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे.
देशभरात ६६ हजार रुग्ण हे एमडीआर टीबीचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ही बाब अत्यंत चिंताजनक असल्यामुळे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मनिषा म्हैसकर यांनी या क्षेत्रातील तज्ज्ञांची बैठक घेऊन पालिकेने कोणत्या उपायोजना करायच्या तसेच जास्तीत जास्त चाचण्या करून टीबीचे रुग्ण कसे शोधायचे याचे धोरण निश्चित केले. त्यानुसार पालिकेच्या रुग्णालयांमध्ये काही खाटा टीबीच्या रुग्णांसाठी राखून ठेवण्याबरोबरच, परिणामकारक व कमीतकमी वेळात निदान होण्याच्या दृष्टीने सहा ‘जेनएक्स’ मशिन घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
यातील पहिले मशिन पुढील महिन्यात शताब्दी रुग्णालयात बसविण्यात येणार असून त्यानंतर केईएम, शीव, नायर आणि कुपर रुग्णालयासाठी वर्षभरात मशिन खरेदी केली जाणार आहेत. या मशिनच्या माध्यमातून टीबी तसेच एमडीआर टीबीचे निदान अवघ्या दोन तासांत होऊ शकते. सामान्यपणे विद्यमान पद्धतीने टीबीची चाचणी केल्यानंतर एका आठवडय़ाने निदान होते. तसेच ब्लड कल्चरचा अहवाल येण्यास चार आठवडय़ांचा कालावधी लागतो. त्यानंतरच कोणत्या प्रकारची औषधयोजना करायची याचा निर्णय घेतला जातो. सध्या मुंबईत धारावीमध्ये केवळ एक मशीन असून याची किंमत ३४ लाख रुपये आहे. मात्र केंद्र व राज्य शासन अथवा पालिका रुग्णालयांसाठी संबंधित कंपनीने हे उपकरण आठ लाख रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली असल्याचे पालिकेतील एका ज्येष्ठ डॉक्टरने सांगितले. पालिका रुग्णालयातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार व्यापक प्रमाणावर तपासणी करण्यासाठी केईएम, शीव आणि नायर रुग्णालयात प्रत्येकी दोन उपकरणे तर सोळा उपनगरीय रुग्णालयांमध्ये अठरा उपकरणे घेण्याची गरज आहे.
संग्रहित लेख, दिनांक 4th Feb 2013 रोजी प्रकाशित
अवघ्या दोन तासात ‘एमडीआर’ टीबीचे निदान!
* देशपातळीवर ३५ लाख रुग्णांच्या थुंकीमध्ये या रोगाचे जंतू सापडतात तर सुमारे पाच लाख लोकांचा दरवर्षी क्षयरोगाने मृत्यू होतो. * एकटय़ा मुंबईत २०१२ मध्ये क्षयाचे दहा हजाराहून तर एमडीआर टीबीचे २४२९ रुग्ण आढळले आहेत. मुंबईसह साऱ्या देशात सध्या एमडीआर टीबीचे (बहुऔषधी उपचार प्रणालीला दाद न देणारा क्षयरोग- मल्टी ड्रग रेझिस्टंट) रुग्ण वाढत असून या रुग्णांचे निदान तात्काळ व्हावे यासाठी मुंबई महापालिकेने अत्यंत अद्ययावत असलेले ‘जेनएक्स’ मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
First published on: 04-02-2013 at 03:08 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mdr tb diagnosis within two hours