आंदोलनाचा मार्ग सोडून राजकीय पक्ष स्थापन करण्यात आणि लगेच निवडणूक लढविण्यात अरविंद केजरीवाल यांनी थोडी घाईच केली, असे परखड प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक नेत्या आणि आम आदमी पक्षाच्या उमेदवार मेधा पाटकर यांनी येथे केले. आंदोलने आणखी काही वर्षे चालविली असती, तर चळवळ आणखी मुरली असती, असे मत व्यक्त करतानाच, पक्षीय राजकारणात न उतरणे अण्णा हजारेंना शोभून दिसते. पण अण्णांनी दुरून तरी आम्हाला पाठिंबा द्यावा. ते माझ्या प्रचारासाठी आले, तर खचितच आवडेल, असेही त्या म्हणाल्या.
 गेली ३८ वर्षे उपेक्षित, पददलित आणि प्रकल्पग्रस्तांसाठी लढे उभारलेल्या सामाजिक चळवळींच्या आधारस्तंभ असलेल्या लढवय्या मेधा पाटकर यांनी आपली वाटचाल आणि राजकारण प्रवेशापासून निवडणूक उमेदवारीबाबत अनेक मुद्दय़ांवर  ‘लोकसत्ता-आयडिया एक्स्चेंज’ कार्यक्रमात मनमोकळ्या गप्पा मारल्या. केवळ श्रीमंतांनाच सर्व सुखसंपत्तीचे लाभ देऊन गरीबांना किमान गरजांपासूनही वंचित ठेवण्याचे विकासाचे सूत्र आम्हाला मान्य नाही. विकेंद्रित विकास झाल्यास त्याची फळे सर्वानाच मिळतील. पण त्यांच्या विकासाची संकल्पनाच विषमतेवर आधारित असल्याने गरिबी, झोपडपट्टय़ा, फेरीवाले यासारखे असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत, असे मतप्रदर्शन पाटकर यांनी केले.
अण्णा हजारेंबरोबरच केजरीवाल यांचे लोकपाल चळवळीतील योगदानही मोठे आहे. पण आंदोलने करणाऱ्यांनी राजकीय पक्ष स्थापनेचा मार्ग स्वीकारण्याच्या मुद्दय़ावर अनेक मतभेद होते. त्यानंतर लगेच दिल्लीची निवडणूक लढविण्याचाही निर्णय घेण्यात आला. त्यात घाई झाली, तरी दुसरा पर्याय नव्हता. काही सहकाऱ्यांच्या चुका झाल्याही असतील. पण वर्षांनुवर्षे भ्रष्टाचार केलेल्या आणि तुरूंगाची हवाही खाल्लेल्यांच्या अपराधांपेक्षा ‘आप’ च्या नेत्यांनी केलेल्या चुका तुलनेने कमी महत्वाच्या आहेत, असे त्यांनी नमूद केले.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आम्ही प्रकल्पांच्या, विकासाच्या आणि ऊर्जाप्रकल्पांच्या विरोधातच आहोत, हा निव्वळ अपप्रचार आहे. पर्यावरण संतुलन राखून सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचणारा विकास आम्हालाही हवा आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा समतोल वापर करून उपलब्ध वीज, पाणी, आरोग्यसुविधा, वाहतूक यांचे सर्व समाजघटकांसाठी समान वाटप झाले पाहिजे. – मेधा पाटकर

मेधा पाटकर उवाच
* एन्रॉनला नव्हे, कराराला विरोध होता
* अणुऊर्जा नको. जलविद्युत आणि अपारंपारिक ऊर्जाप्रकल्प हवेत
* पाईपलाईन, नाल्यांवर झोपडय़ा नकोत, मात्र गरिबांना घर हवेच
* फेरीवाल्यांनाही जगण्याचा हक्क आहे
* श्रमिकांशिवाय धनिकांचे जीवन परिपूर्ण नाही
* वीज, पाणी, रस्तेसारख्या सुविधा धनिक अधिक वापरतात.
मेधा पाटकर यांच्याशी अतिशय रंगलेल्या या गप्पा सविस्तरपणे वाचा, रविवार (९ मार्च) च्या अंकात.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Medha patkar in loksatta idea exchange
First published on: 05-03-2014 at 02:47 IST