पाचशे, एक हजाराच्या नोटा बंद झाल्याने रुग्णांना पर्याय

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटांवर बंदी आल्यानंतर औषधांच्या दुकानांतून या नोटा घेण्यास नकार मिळू लागल्यामुळे औषधांसाठी सगळीकडे हेलपाटे मारण्याऐवजी रुग्णांच्या कुटुंबीयांनी आता इंटरनेटचा आसरा घेतला आहे. इंटरनेट तसेच विविध मोबाइल अ‍ॅप्सच्या माध्यमातून औषधांची खरेदी करण्यास आता प्राधान्य दिले जात असून त्यामुळे ‘ऑनलाइन फार्मसी’चा व्यवसाय तेजीत आला आहे.

बुधवारपासून औषधांच्या दुकानात सुटे पैसे नसल्यामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी खासगी रुग्णालयांनी ५०० आणि १००० रुपयांचा नोटा स्वीकारण्याचे आदेश दिले असतानाही अनेक खासगी रुग्णालयांकडे असे परिपत्रक आले नसल्याचे सांगण्यात आले. औषधांच्या दुकानात औषधे मिळत नसल्याने रुग्णांनी ऑनलाइन फार्मसीकडे धाव घेतली आहे. गुरुवारी बँका सुरू झाल्या असल्या तरी बँकांबाहेरील गर्दी पाहता अनेक जण तासभर उभे राहून परतत होते. या दोन दिवसांत वेगवेगळ्या ऑनलाइन कंपनीचे संदेश मोबाइलवर फिरत होते. या संदेशात फार्मसी कंपन्यांचे मोबाइल क्रमांकही देण्यात आले असल्यामुळे रुग्णांना फोन करून औषधे मागविणे सोपे झाले. एरवी आमच्याकडे एका दिवसाला २५ ते ३० औषधांच्या ऑर्डर येतात, मात्र गुरुवारी ही ऑर्डर दुपटीने वाढून ५० ते ६० पर्यंत पोहोचली, असे औषधे पुरविणाऱ्या मेडिकलचे मालक प्रखर जैन यांनी सांगितले.

राज्य सरकारकडून ५०० आणि १००० रुपये स्वीकारण्याचे परिपत्रक आल्यानंतर आम्ही ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा घेणे सुरू केले. या दोन दिवसांत नेहमीपेक्षा अधिक मागणी आली असून अनेक नागरिक औषधांचा साठा करीत असल्याचे लक्षात आले, असे फार्माईजी या ऑनलाइन फार्मसी कंपनीचे धर्मिल शेठ यांनी सांगितले. ऑनलाइन औषधांवर मिळणारी सवलत आणि घरपोच सेवा यामुळेही रुग्णांना हे सोयीचे असते. त्यामुळे ऑनलाइन फार्मसी कंपन्यांचा दोन दिवसांतील व्यवसाय तेजीत होता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Medicine purchase online
First published on: 12-11-2016 at 01:58 IST