लोकसत्ता प्रतिनिधी मुंबई : भारतीय रेल्वेच्या विविध विभागांमध्ये ब्लॉक घेऊन पायाभूत विकास कामे करण्यात येत आहेत. पुढील आठवड्यात कोकण रेल्वेवर दोन वेगवेगळ्या ठिकाणी रेल्वे मार्ग व इतर पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात कोकण रेल्वेवरील पाच रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार असून त्यामुळे प्रवाशांना प्रवासासाठी अधिक वेळ लागणार आहे. कोकण रेल्वेवरील कडवाई - रत्नागिरीदरम्यान १० ऑक्टोबर रोजी सकाळी ७.४० ते सकाळी १०.४० या कालावधीत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे ९ ऑक्टोबर रोजी गाडी क्रमांक १९५७७ तिरुनवेल - जामनगर रेल्वेगाडी ठोकूर - रत्नागिरीदरम्यान तीन तास थांबवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक १६३४६ तिरुवनंतपुरम सेंट्रल - लोकमान्य तिलक (टी) नेत्रावती एक्स्प्रेस ठोकूर - रत्नागिरीदरम्यान १.३० तास थांबवण्यात येईल. गाडी क्रमांक १२०५१ मुंबई सीएसएमटी ते मडगावदरम्यान धावणारी जनशताब्दी एक्स्प्रेस खेड - चिपळूणदरम्यान २० मिनिटे थांबवण्यात येणार आहे. आणखी वाचा-“मी गोल्डी ब्रार बोलतोय, पुढच्या दोन दिवसांत…”, मुंबईतील काँग्रेस आमदाराला जीवे मारण्याची धमकी १२ ऑक्टोबर रोजी मडगाव - कुमटादरम्यान सकाळी ११ ते दुपारी २ या कालावधीत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे गाडी क्रमांक ०६६०२ मंगळुरू सेंट्रल - मडगाव रेल्वेगाडी मंगळुरू - कुमटा दरम्यान धावेल. तर कुमटा - मडगावदरम्यान ही गाडी रद्द करण्यात येणार आहे. गाडी क्रमांक ०६६०१ ही मडगाव - मंगळूरदरम्यान विशेष गाडी कुमटा - मंगळुरू म्हणून धावेल, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.