दिवाळीच्या वेळी सानुग्रह अनुदान मिळण्याची गेल्या एक तपापासूनची मागणी अखेर ‘म्हाडा’ प्रशासनाने मान्य केली असून कर्मचाऱ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष सतीश गवई यांनी जाहीर केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
दिवाळीत जवळपास सर्व सरकारी उपक्रमांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना बोनस-सानुग्रह अनुदान मिळते. पण ‘म्हाडा’तील कर्मचारी त्यापासून वंचित होते. गेली १२ वर्षे त्यासाठी कर्मचारी संघटना लढत होत्या. यंदा मात्र, उपाध्यक्ष सतीश गवई यांनी प्रत्येकी दहा हजार रुपयांचा सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर केले. गवई यांनी सानुग्रह अनुदानाचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे आता तेच ‘म्हाडा’ कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाचा प्रश्नही मार्गी लावू शकतात अशी आशा कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय १९८२ मध्ये घेण्यात आला होता. पण ‘म्हाडा’ने त्याची अंमलबजावणी केली नाही. कायम हा प्रश्न सरकारच्या दरबारात टोलावला जातो. सानुग्रह अनुदानाप्रमाणेच आता गवई यांनी म्हाडा कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनाचा प्रश्नही मार्गी लावावा, अशी अपेक्षा ‘म्हाडा निवृत्त कर्मचारी उपोषण समितीचे कृष्णा जाधव यांनी व्यक्त केली आहे.