लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील ‘जगदंबा’ तलवारीचे दर्शन घडले आणि अंगावर रोमांच उभे राहिले. क्षणातच ही तलवार भारतात आणण्याची इच्छा झाली. या तलवारीच्या संरक्षणासाठी तेथे दोन रक्षकांचा खडा पहारा आणि तलवारीची बडदास्त पाहून ती इथे आणण्याची इच्छा मावळली. जुन्या वास्तू, वस्तू, दस्तऐवज जपून ठेवण्याची वृत्ती लंडनवारीमध्येदृष्टीस पडली. ही मानसिकता आजही भारतीयांमध्ये नाही. ती जोपासण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले.
‘प्रवासवर्णन’कार व लेखिका डॉ. मीना प्रभू यांच्या ‘न्यूयॉर्क न्यूयॉर्क एका नगरात जग’ या आगामी पुस्तकाच्या निमित्ताने त्यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम सोमवारी दादरच्या वीर सावरकर स्मारकातील सभागृहात झाला. पुरंदरे प्रकाशन आणि ‘लोकसत्ता’ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या खास शैलीत मीना प्रभू यांच्याशी संवाद साधला. मीना प्रभू यांनी आपल्याला लंडनचे दर्शन घडविल्याचा उल्लेख करीत बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यावेळच्या आठवणींना उजाळा दिला.
छत्रपती शिवाजी महाराजांची ‘भवानी’ तलवार लंडनमध्ये असल्याचे बोलले जाते. पण ती ‘जगदंबा’ तलवार आहे. या तलवारीचे दर्शन लंडनवारीमध्ये घडले आणि मन तृप्त झाले. या तलवारीची बडदास्त तेथे ठेवण्यात आली आहे. तशी बडदास्त भारतात ठेवली जाईल का अशी शंकेची पाल मनात चुकचुकली आणि ती तलवार आणण्याची इच्छा क्षणातच मावळली.
चार्ल्स विल्यम्स यांच्या वंशजाच्या भेटीचा योग लंडनमध्ये आला. सवाई माधवराव पेशवे यांनी त्यांना दिलेला मोत्याचा रत्नजडीत शिरपेच आणि मोत्याचा कंठा त्यांच्या वंशजाने आजही जपून ठेवला आहे. इतकेच नव्हे तर त्याकाळी मोडी लिपीमधील चार्ल्स विल्यम्स यांना आलेली पत्रेही त्यांनी दाखविली. हा दस्तऐवज पाहून मन हरकून गेले. ही मानसिकता केवळ लंडन आणि रशियामध्येच अनुभवयाला मिळते, असे बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितले.
लंडनमध्ये फिरताना हा देश शत्रूचा असल्याची भावना मनात निर्माण होते. आता हा देश भारताचा शत्रू नाही. पण एकेकाळी याच देशाने भारतावर १५० वर्षे राज्य केले.
भारताची प्रचंड पिळवणूक केली. पण आज लंडनमध्ये फिरताना त्यांच्याकडून अनेक गोष्टी घ्याव्याशा वाटतात. लंडनकडून घ्यायचे ठरवले तर पारतंत्र्यात झालेल्या नुकसानापेक्षा कैकपटीने अधिक भारताचा फायदाच होईल, असेही बाबासाहेब म्हणाले. डॉ. मीना प्रभू यांनी दर्शन घडविलेल्या लंडनमधील अनेक आठवणींनाही बाबासाहेब पुरंदरे यांनी यावेळी उजाळा दिला.
लंडनमधील एका बेटावरील विहिरीतील पाणी काढण्यासाठी १६०५ मध्ये मोठे रहाट बसविले आहे. गाढवाच्या मदतीने या विहिरीतील पाणी काढण्यात येत होते. तर एका किल्ल्याच्या बोधचिन्हावर बोकडाचे चित्र दृष्टीस पडले. बोकडाला तेथे इतका मान मिळतो. पण दिंडीमध्ये ज्ञानेश्वरांचा घोडा धावू लागला की टिंगल केली जाते, अशी खंत व्यक्त करून बाबासाहेब पुरंदरे म्हणाले की, भावना नावाचा पदार्थ आहे, पण तो आपल्याला गवसलेला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. मीना प्रभू लिखित न्यूयॉर्क  न्यूयॉर्क- एका नगरात जग, मेक्सिकोपर्व, वाट तिबेटची, चिनीमाती, ग्रीकांजली, रोमराज्य भाग १, रोमराज्य भाग २, माझं लंडन, तुर्कनामा, गाथा इराणी, दक्षिणरंग, इजिप्तायन अशा १२ प्रवासवर्णनांची ६,४०० रुपये किमतीची पुस्तके अवघ्या १६०० रुपयांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहेत. हा १२ पुस्तकांचा संच खरेदी करणाऱ्यांना ‘स्लाईड शो’मध्ये समाविष्ट असलेल्या तब्बल दोन हजार छायाचित्रांची डीव्हीडी मोफत देण्यात येणार आहे. ही योजना मर्यादित कालावधीसाठी असून http://www.pponlinestore.com या संकेत
स्थळावर नोंदणी केल्यास मोफत घरपोच सेवा उपलब्ध होईल. अधिक माहितीसाठी संपर्क – पुरंदरे प्रकाशन, दूरध्वनी क्रमांक ०२०-२४४७५३१०, मोबाईल क्रमांक ९०९६०८३६८२.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mindset need for heritage protect says babasaheb purandare
First published on: 07-01-2015 at 03:03 IST