हिवाळ्यात उकाडय़ाचा अनुभव घेतल्यानंतर पुन्हा एकदा थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. आकाशातील ढग निवळल्यामुळे आणि पश्चिमी वाऱ्यांसोबत उत्तरेकडील राज्यांमध्ये आलेली थंडीची लाट या दोन्हींचा परिणाम राज्यभर दिसायला लागला असून शनिवारी बहुतांश ठिकाणी किमान तापमानात घट झाली. मुंबईचे किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त असले तरी मागील चार दिवसांच्या तुलनेत त्यात पाच अंश से.ची घसरण झाली आहे. विदर्भातील बहुतांश जिल्हेही थंडीने गारठले आहेत.

विदर्भातील किमान तापमान सरासरीपेक्षा पाच अंश से.हून अधिक घसरले. नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, ब्रह्मपुरी या ठिकाणी रात्रीचे तापमान १० अंश से. दरम्यान होते.  ब्रह्मपुरी येथे राज्यातील सर्वात किमान तापमानाची ९ अंश से.ची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातही तापमानात घसरण झाली असून कोकणात सरासरीपेक्षा तापमान अधिक असले तरी मागील काही दिवसांपेक्षा हवेतील गारवा वाढला आहे. मुंबईत शनिवारी सांताक्रूझ येथे १६.८ अंश से. तापमान नोंदले गेले. मंगळवारी किमान तापमान २१.३ अंश से. होते. त्यानंतर तापमानात सातत्याने घट झाली. हाच प्रकार डहाणू, रत्नागिरी या किनाऱ्यावरील शहरांमध्ये दिसला.

दिवसाचे तापमान मात्र फारसे कमी होताना दिसत नाही. राज्यात बहुतेक ठिकाणी कमाल तापमान ३० अंश से.हून अधिक आहे.

पश्चिमी वाऱ्यांमुळे आलेली थंडीची लाट आणि पूर्वेकडील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हिमालय परिसरात सोमवार ते बुधवारदरम्यान हिमवृष्टी होण्याचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे या भागात दाट धुके पसरण्याची शक्यता आहे.

किमान तापमान (अंश से.मध्ये)

सांताक्रूझ – १६.८, डहाणू – १९.२, रत्नागिरी – १७.६, वेंगुर्ला – १५.५, महाबळेश्वर – १४.४, नाशिक – ११.२, औरंगाबाद – १३.८, पुणे – ११.९, सातारा – १२.२, सांगली – १५, अमरावती – १३.४, परभणी – १०, ब्रह्मपुरी – ९, चंद्रपूर – १०.४, गोंदिया – ९.७, नागपूर – १०, उस्मानाबाद – ९.३.