मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन; पाणीपुरवठा योजनेचे काम लवकरच
मेट्रो रेल्वे कासारवडवली ते दहिसर माíगकेने जोडण्याचा प्रयत्न असून त्यात मीरा-भाईंदरलाही जोडण्यात येईल, असे ठोस आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मीरा रोड येथे दिले. मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या पाणीयोजनेचे व प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र धोकादायक इमारतींच्या पुनर्बाधणीचे धोरण व मानीव अभीहस्तांतरणात उद्भवणाऱ्या समस्या यावर मुख्यमंत्र्यांनी कोणतेही आश्वासन दिले नाही.

अंधेरी ते दहिसर या मेट्रो रेल्वेचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. या योजनेत मीरा-भाईंदरचा समावेश नसल्याने येथील नागरिकांमध्ये नाराजी होती. कासारवडवली ते दहिसर या माíगकेची व्यावहारिकता तपासण्याचे आदेश दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनला देण्यात आले असून त्याचा अहवाल येत्या चार महिन्यांत अपेक्षित असून तो सकारात्मकच येईल अशी अपेक्षा आहे, अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला तातडीने सुरुवात करण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

वेगाने होणारे शहरीकरण ही समस्या न मानता ती विकासाची संधी आहे असे मानून सरकार त्या दिशेने पावले टाकत आहे. सर्वसामान्यांना सुखसोयी देण्यासाठी स्मार्ट सिटी व अमृत योजनेद्वारे शहरात सरकार गुंतवणूक वाढवत आहे. भूमिपूजन झालेल्या पंचाहत्तर दशलक्ष लिटर पाणीयोजनेमुळे शहराची तहान काही प्रमाणात भागणार असली तरी मीरा-भाईंदरसह वसई-विरारसाठीही चारशे चार दशलक्ष लिटर्सची सूर्या धरण पाणीयोजना महत्त्वाची आहे. योजनेसाठी आवश्यक असलेल्या वनविभागाच्या परवानग्या येत्या दोन-तीन महिन्यांत उपलब्ध होतील व त्यानंतर योजना सुरू होईल व दोन्ही महानगरपालिकांना पाणीटंचाई जाणवणार नाही. मात्र आपल्याकडील पाण्याचे नसíगक स्रोत मर्यादित असल्याने महानगरपालिकांनी पाणीयोजनेसोबतच मलनिस्सारण योजनाही राबविल्याच पाहिजेत, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दहिसर, भाईंदरमाग्रे वसई जोडणारा आठशे कोटींचा रस्त्याला आधीच मंजुरी देण्यात आली असून त्याच्या निविदेचे काम सुरू झाले आहे; तसेच भाईंदर-गोराई रस्ता रुंदीकरणाचे कामही लवकरच हाती घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले.
शासनाने महानगरपालिकांसाठी बनवलेल्या सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी सुरू करून त्या ऑनलाईन उपलब्ध करून द्याव्यात तसेच इमारतींचे आराखडे मंजूर करताना मानवी हस्तक्षेप होऊ नये याची खबरदारी घ्यावी व प्रशासकीय कारभार सुधारावा, असा सल्लाही त्यांनी या वेळी दिला.

शिवसेनेसह काँग्रेस आघाडीचा कार्यक्रमावर बहिष्कार
पाणीयोजना मंजूर करण्यात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा महत्त्वाचा वाटा असतानाही त्यांना कार्यक्रमाला निमंत्रित न केल्याने शिवसेनेने तर आघाडीने केलेल्या कामाचे श्रेय भाजप लाटत आहे असा आरोप करून काँग्रेस व राष्ट्रवादी कांग्रेसने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. यामुळे भूमिपूजनाचा कार्यक्रम भाजप कार्यकर्त्यांपुरताच मर्यादित राहिल्याचे दिसून आले.