भर उन्हात पोलीस भरतीसाठी ताटकळत ठेवल्याने उमेदवार मृत्युमुखी पडूनही भरतीच्या नियोजनातील ढिसाळपणा कमी झाला नसल्याचे पहिल्या दिवशी दिसून आले. बुधवारी भरतीसाठी सकाळी सात वाजता बोलावलेल्या सुमारे ४०० तरुणांची धावण्याची चाचणी सायंकाळी पाच वाजता घेण्यात आली. तब्बल १० तास हे उमेदवार आपली चाचणी केव्हा होणार याची वाट पाहत थांबून होते. पोलिसांच्या या ढिसाळ नियोजनाचा फटका ग्रामीण भागातून भरतीसाठी आलेल्या तरुणांना बसला असून दिवसभर या तरुणांनी रस्त्यावर झोपून काढला.
महाराष्ट्र पोलिसांतील चार हजार पदांसाठी सध्या भरती सुरू असून बुधवारी यातील सुमारे ४०० उमेदवारांना कांजूर मार्ग येथील राखीव रस्त्यावर सकाळी सात वाजता बोलावण्यात आले. त्यानुसार, राज्यभरातील अनेक उमेदवार सकाळी हजर झाले. त्या वेळी उपस्थित पोलिसांनी तास-दोन तासांत चाचणी घेण्याचे आश्वासन दिले. परंतु, अकरा वाजेपर्यंत चाचणी घेण्यात आली नाही. १६०० मीटर धावण्याच्या चाचणीचे मापन यांत्रिक पद्धतीने करण्यात येणार असून त्यामुळे उशीर होत असल्याचे दुपारी तीन वाजता सांगण्यात आले. तोपर्यंत उपाशी असलेल्या या उमेदवारांना जेवण करण्याची सूचना पोलिसांनी दिली. अखेर सायंकाळी पाच वाजल्यानंतर या तरुणांच्या चाचणीला सुरुवात झाली. बुधवारी सकाळपासून पोलिसांचे काहीच नियोजन नव्हते, त्यामुळे आमचे कमालीचे हाल झाले, असे एका उमेदवाराने लोकसत्ताशी बोलताना सांगितले. याविषयी पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, सर्व प्रक्रिया सुरळीत झाल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले.

सन २०१४ मध्ये पोलीस भरतीदरम्यान धावण्याच्या चाचणीत चक्कर येऊन दोन उमेदवार मृत्युमुखी पडले होते. त्या वेळी राज्य सरकारने हस्तक्षेप करत भरतीच्या निकषांत बदल सुचवले. त्यानुसार धावण्याची चाचणी सकाळी ११ वाजण्याआधी आणि सायंकाळी चार वाजल्यानंतर घेण्यात येते.